Maharashtra Politics: विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या गटाला शह देण्यासाठी शरद पवार डाव टाकू लागले आहेत. अजित पवारांच्या आमदारांना पाडण्याचा चंगच त्यांनी बांधला आहे.
मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. भाग्यश्री आत्राम हलगीकर यांचा पक्षप्रवेश १२ सप्टेंबरला गडचिरोलीतील अहेरीत संपन्न होईल. त्या वडिलांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आत्राम यांच्यासह अजित पवारांचं टेन्शन वाढलं आहे. धर्मराव बाबा आत्राम अहेरीचे तीन टर्मचे आमदार आहेत. १९९९, २००४ आणि २०१९ मध्ये ते निवडून आले. सध्या ते महायुती सरकारमध्ये मंत्री आहेत.
‘विरोधकांकडून माझ्या लेकीला हाताशी घेऊन पक्ष फोडण्याचं काम सुरू आहे. पण जी मुलगी बापाची झाली नाही, ती तुमच्या पक्षाची कशी होणार? माझ्याकडे दुधारी तलवार आहे. माझ्या वाटेला गेलात तर म्यानातून तलवार बाहेर काढणार. एक मुलगी गेली तरी एक मुलगी आणि एक मुलगा माझ्याकडे आहे. आत्राम घराणं हलगेकर (मुलगी आणि जावई) यांना नदीत टाकल्याशिवाय राहणार नाही,’ असा इशारा आत्राम यांनी दिला होता. त्यावेळी अजित पवार व्यासपीठावरच उपस्थित होते.
Maharashtra Politics: वडिलांकडून नदीत फेकण्याची भाषा, लेक शरद पवार गटात जाणार; काकांचा पुतण्याला आणखी एक धक्का!
धर्मराव बाबा आत्राम २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अहेरी मतदारसंघातून विजयी झाले. २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. आत्राम यांनी अजित पवारांना साथ दिली. ते महायुती सरकारमध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे मंत्री झाले. १९९९ मध्ये ते गोंडाणा गणतंत्र पक्षाकडून आमदार झाले. त्यानंतर २००४ मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजयी झाले. २०१९ मध्ये ते पुन्हा निवडून आणले.