Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शासकीय निवासस्थानी साकारण्यात आलेल्या गणेशोत्सवाच्या देखाव्यातून महायुती सरकारच्या योजनांची माहिती देण्यात आलेली आहे.
महायुती सरकारच्या विविध योजनांची माहिती देणारा देखावा वर्षावरील गणपतीसाठी उभारण्यात आला आहे. पण या देखाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोटो गायब आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो स्पष्टपणे दिसून येत आहेत. पण दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांचा फोटो दिसत नाही. त्यामुळे महायुतीत सर्वकाही आलबेल नसल्याचं चित्र आहे. गणपतीच्या देखाव्यातून महायुतीमधील सुंदोपसुंदीचा ‘देखावा’ पाहायला मिळाला आहे.
महायुती सरकारकडून राबवण्यात आलेल्या जवळपास सगळ्याच योजनांची माहिती देखाव्याच्या माध्यमातून देण्यात आली आहे. त्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचाही विशेष उल्लेख आहे. याशिवाय राज्यभरात राबवण्यात आलेल्या योजनांची माहिती, त्यामुळे झालेले फायदे देखाव्यातून दाखवण्यात आलेले आहेत. पण अनेक योजनांमधून उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोटो गायब आहे. तर दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फोटो आवर्जून लावण्यात आला आहे.
राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये शिंदेसेनेचे आमदार, खासदार, मंत्री आहेत. त्यांचे फोटो महाराष्ट्राच्या नकाशात त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात दाखवण्यात आले आहेत. त्या त्या भागातील योजनांचा उल्लेख तिथे तिथे करण्यात आलेला आहे. लाडकी बहीणचा उल्लेख असलेल्या ठिकाणी शिंदे, फडणवीसांचे फोटो आहेत. पण अजित पवार यांचा फोटो नाही. या देखाव्यात कल्याणचे खासदार आणि मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदेंचा फोटो अनेक ठिकाणी दिसून येत आहे.
Maharashtra Politics: धुसफुशीचा ‘देखावा’! आधी दादांकडून ‘मुख्यमंत्री’ गायब; आता शिंदेंकडून दादा गायब, काय घडलं?
विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून राज्यभर जनसन्मान यात्रा सुरु केली आहे. त्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख माझी लाडकी बहीण असा करण्यात आला आहे. अजित दादा गटानं योजनेच्या नावातून मुख्यमंत्री शब्द वगळल्यानंतर आता वर्षावरील देखाव्यातून अजित पवारांचे फोटो वगळल्याचं दिसून येत आहे.