Sunil Kedar Controversial Statement: सातगाव ग्रामपंचायतीचे सरपंच योगेश सातपुते यांची बाजू घेत काँग्रेस नेते सुनील केदार यांनी वादग्रस्त व्यक्तव्य केले आहे. सातपुते यांना अटक झाली तर आपण नागपूर जिल्हा पेटवू असे केदार यांनी म्हटले आहे.
हिंगणा विधानसभा मतदारसंघातील सातगाव ग्रामपंचायतीचे सरपंच योगेश सातपुते यांनी गावातील दलित महिला उपसरपंच यांच्यावर अशोभनीय आणि जातीवाचक वक्तव्य केले होते. याच्या विरोधात दलित महिला उपसरपंच यांनी बुटीबोरी पोलीस ठाण्यात सरपंच योगेश सातपुते यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. महिला उपसरपंच यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध एससी-एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर काँग्रेस नेते सुनील केदार यांनी गावाला भेट दिली आणि त्यानंतर भर सभेत सरपंच योगेश सातपुते यांच्या कृत्याचे समर्थन करत म्हणाले, ‘योगेशचा केसाला सुद्धा धक्का बसला किंवा अटक केली तर मी संपूर्ण नागपूर जिल्हा पेटवून देईन’, अशी धमकी यावेळी सुनिल केदार यांनी दिली. मात्र नागपूर जिल्ह्यात सुनील केदार यांच्या धमकीवजा शब्दांचा व्हिडिओ वायरल होत आहे.
केदार यांचा या वादग्रस्त आणि भडकाऊ वक्तव्य केल्याप्रकरणी केदार यांच्या अटकेची मागणी भाजपने केली आहे. नागपूर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते आतिष उमरे आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेत दलित उपसरपंच विरोधात अपशब्द वापरणाऱ्या योगेश सातपुतेला तात्काळ अटक करण्याची मागणी यांनी केली.
तुमच्या केसाला सुद्धा धक्का बसला तर मी संपूर्ण नागपूर जिल्हा पेटवून देईन; सुनील केदार यांचे भडकाऊ वक्तव्य
यासोबतच आरोपीला पाठीशी घालणाऱ्या सुनील केदारला अटक करून नागपूर जिल्ह्यातील वातावरण पेटवण्याची भाषा करणाऱ्या सुनील केदारला अटक करून गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली.