Tumbbad box office collection: काही वर्षांपूर्वी आलेला तुंबाड हा सिनेमा प्रचंड गाजला. आजही या चित्रपटाची चर्चा होते. त्यामुळं हा सिनेमा पुन्हा प्रदर्शित करण्यात आला.. री-रिलीजनंतरही तुंबाडनं चांगली कमाई केली आहे.
तुंबाडच्या री-रिलीजनें इतिहास घडवला आहे. त्यानं ‘शोले’, ‘मुघल-ए-आझम’ आणि ‘रॉकस्टार’सारख्या आयकॉनिक चित्रपटांचे विक्रम मोडले आहेत. या चित्रपटाने नवीन पिढीच्या प्रेक्षकांवर गारूड केलंय आणि २०१८ च्या मूळ रिलीजपेक्षा तिप्पट अधिक ओपनिंग वीकेंड बॉक्स ऑफिस कलेक्शनसह उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
‘तुंबाड’ हे भारतीय लोककथांवर आधारित कथानक आहे, जसं की “दादीमा की दंतकथा” आणि याचा मुख्य संदेश आहे “लालच बुरी बला है”. हा चित्रपट एक अद्वितीय सिनेमॅटिक अनुभव देतो आणि भारतभरातील प्रेक्षक त्याचा उत्साहानं आनंद घेत आहेत. या री-रिलीजनं ऐतिहासिक यश संपादन केलं आहे.
सहा वर्षांपेक्षा जास्त काळात तयार झालेला ‘तुंबाड’ हा निर्मात्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. चित्रपटातील दृश्ये खऱ्या पावसात चित्रित केली गेली आहेत, ज्यामुळे मान्सूनचं नैसर्गिक सौंदर्य खुलवलं गेलें आहे. बॉलिवूडमधील पहिल्या व्हीएफएक्ससमृद्ध चित्रपटांपैकी एक म्हणून, ‘तुंबाड’नं हॉलिवूडच्या पातळीवरील तंत्रज्ञानाचा वापर केला, ज्यात स्वीडनमधील तज्ज्ञ मंडळींचा सहभाग होता.
री-रिलीजनंतरही ‘तुंबाड’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, काही दिवसांतच केली इतक्या कोटींची कमाई
कमाई किती?
री-रिलीज झाल्यानंतर तुंबाड सिनेमानं पहिल्या दिवशी १.६५ कोटींची कमाई केली होती. वीकेंडला या सिनेमाच्या कमाईत वाढ झाल्याचं दिसून आलं.
दुसऱ्या दिवशी सिनेमानं २.६० कोटींचा गल्ला जमवला. तर तिसऱ्या दिवशी ३.२५ कोटींची कमाई केली. आतापर्यंत सिनेमानं आठ कोटींच्या जवळपास कमाई केल्याचं म्हटलं जात आहे.
निर्मात्यांच्या कथेतील निष्ठा आणि प्रत्येक फ्रेमवर घेतलेली मेहनत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी आहे. या री-रिलीजमुळं ‘तुंबाड’नं पुन्हा एकदा स्वत:ला एक महान चित्रपट म्हणून सिद्ध केलं आहे. सोहम शहा म्हणतात, “ओटीटीवर प्रेक्षकांकडून ‘तुंबाड’ला मिळालेलं प्रेम मी सदैव लक्षात ठेवीन. पण आमच्यासाठी, सोहम शाह फिल्म्समध्ये, आम्ही हा चित्रपट एक अद्वितीय सिनेमॅटिक आणि थिएट्रिकल अनुभव देण्याच्या उद्देशाने बनवला होता. या री-रिलीजमुळे ते स्वप्न साकार होताना पाहून मला खूप आनंद होत आहे. कारण ‘तुंबाड’ हा असा चित्रपट आहे जो केवळ मोठ्या पडद्यावरच पाहायला हवा, कारण सिनेमा कधी कधी जादू दाखवतो.” ‘तुंबाड’ च्या वारशात आणखी भर घालत, सोहम शहा यांनी अधिकृतपणे ‘तुंबाड २’ची घोषणा केली आहे. प्रेक्षक उत्सुकतेने पुन्हा त्या गूढ पण आकर्षक जगात जाण्यासाठी सज्ज आहेत, ज्याने सहा वर्षांपूर्वी त्यांची कल्पनाशक्तीचा वेध घेतला होता. आणि आता सर्वांनाच अधिक रोमांचकारी अशा सिक्वेलची प्रतीक्षा आहे.