लाव रे ‘तो’ सिनेमा! ‘येक नंबर’ चित्रपटाची संकल्पना स्वतः राज ठाकरे यांना सुचली होती? छुप्या प्रचाराचा राजकारण्यांना होणार फायदा?

upcoming marathi political movies:येत्या महिन्यात आचार संहिता लागण्याची शक्यता आहे. दरम्यान राजकीय प्रचारासाठी वातावरण निर्मिती व्हावी म्हणून नेत्यांनी सिने-नाट्य क्षेत्राला जवळ केल्याचं चित्र दिसतंय. सिनेमाचा पडदा असो वा रंगभूमी; दोन्हीकडून छुप्या प्रचाराचा ‘गंध’ दरवळतोय. त्यामुळे राजकारण्यांना काही सांगायचंय, काही दाखवायचंय, याकडे प्रेक्षक कान देऊन ऐकत आहेत आणि डोळे उघडे ठेवून पाहत आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनोरंजनविश्वात राजकीय आवाज घुमतोय. कधी हा आवाज थेट ऐकू येतोय तर कधी छुपी कुजबुज कानी पडतेय! राजकीय स्पर्श असलेल्या सिने-नाट्याचा धडाका आता सिनेमांच्या पडद्यावर आणि रंगभूमीच्या मंचावर सुरू होण्याची चिन्हे आहेत. कुणाची ‘मशाल’ धगधतेय तर कुणाचा ‘बाण’ अचूक निशाण्यावर लागलाय. तर कुणाच्या ‘इंजिन’चा आवाज घुमतोय. अशात प्रेक्षकांनी मात्र आपल्या कपाळावर हात मारलाय. कारण राजकीय प्रचाराचं हे नवं माध्यम आणि त्यांचं बिंग अगोदरच उघडं पडल्याची भावना तमाम जाणकार सिनेरसिकांकडून आणि प्रेक्षकांकडून उमटताना दिसतेय. त्यामुळे या छुप्या प्रचाराचा कितपत फायदा या राजकारण्यांना आगामी काळात होईल? हे पाहणं निर्णायक असेल.

मध्यंतरी लोकसभा निवडणुकीच्या काळात ‘सिनेनिर्माते नेत्यांना खुश करणारे चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी धडपडत होते’ असा काहीसा समज जनमानसात दिसला. सिनेमांचे विषय राजकीय दृष्ट्या अधिक आकर्षित, थेट आणि तितकेच रक्तरंजित झाल्याचंही बोललं गेलं. ‘मैं अटल हूँ’, ‘फायटर’, ‘आर्टिकल ३७०’, ‘यात्रा २’, ‘ऑपरेशन व्हॅलेंटाइन’, ‘बस्तर: द नक्सल स्टोरी’, ‘रझाकार’, ‘ए वतन मेरे वतन’, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ आदी सिनेमांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. याची पुनरावृत्ती आता राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी होताना दिसतेय. सिनेमाच्या पडद्यालाही राजकारणाचा रंग चढताना दिसतोय आणि हा रंग जसजशी निवडणूक जवळ येईल तसा अधिक गडद होईल, असे सिनेमा व्यावसायिक सांगतात.

मराठीच्या मोठ्या पडद्यावर काय?

मे, २०२२मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर:मुक्काम पोस्ट ठाणे’ या सिनेमाच्या प्रदर्शनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात झालेली उलथापालथ कुणीच विसरू शकत नाही. आता ‘धर्मवीर २’ हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झालाय. या सिनेमावर बारकाईनं काम सुरू होतं. सिनेमातील काही भागांचं पुन्हा चित्रीकरण झाल्याचं कळतंय. तसंच दुसरीकडे ‘येक नंबर’ या सिनेमाच्या टिझरमधील ‘त्या’ आवाजानं प्रेक्षकांचं लक्ष वेधलंय. या सिनेमाची निर्मिती सह्याद्री फिल्म्सने केली आहे. ही सिनेनिर्मिती संस्था ठाकरे कुटुंबाशी संलग्न असल्याची चर्चा आहे. सिनेमाविषयी निर्माती तेजस्विनी पंडित हिने सांगितलं की, ‘सिनेमाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. अनेकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. मराठी प्रेक्षक कथानकाला विशेष प्राधान्य देतात. ‘येक नंबर’ची कथा अतिशय कमाल असून ही कथाच या चित्रपटाचा नायक आहे.’ दुसरीकडे नाव न सांगण्याच्या अटीवर सिनेविश्वातील जाणकारानं सांगितलं, ‘जरी ‘येक नंबर’ हा राज ठाकरे यांच्यावर आधारित अधिकृत बायोपिक नसला तरी, तो त्यांच्या जीवनाची प्रेरणा घेऊन बनवण्यात आलाय. या सिनेमाची संकल्पना स्वतः ठाकरे यांना सुचली होती, त्यानंतर ती लेखकानं पुढे लिहिली’. तसंच लवकरच कंगना रणोट हीचा ‘इमर्जन्सी’ हा सिनेमादेखील प्रदर्शनासाठी धडपडत आहे. सिनेमा प्रदर्शित होऊ नये म्हणून राजकीय दबाव असल्याची सिनेवर्तुळात चर्चा आहे.

उमेद भवनात अजूनही फिरतो अभिनेत्रीचा आत्मा? मुलाचीही शिरच्छेद करुन हत्या,वडिलांमुळेच ओढावलेली वेळ
‘ते’ सिनेमे बनवण्याची मोकळीक नाही
‘सिनेदिग्दर्शकाला राजकीय विचारसरणी असू नये, असं मुळीच नाही. चित्रपट हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम असल्यामुळे प्रचारकी थाटाचे विचार सिनेमातून यापूर्वीही मांडले गेले आहेत. जागतिक स्तरावरील चित्रपटांमध्येही अशी अनेक उदाहरणं सापडतील. परंतु, तसं करत असताना काही विघातक घडणार नाही याची काळजी निर्मात्यांनी घ्यायला हवी. सिनेमाचा वापर राजकारणासाठी सोयीस्कर पद्धतीनं केला जाऊ नये. ‘सिंहासन’, ‘सामना’सारखे प्रखर पारदर्शी सिनेमे बनवण्याची मोकळीक आज नाही. पण हेही दिवस जातील. काळ आणि राजवटीतील माणसं बदलतील. खऱ्या समाजाचं प्रतिबिंब पुन्हा सिनेमात दिसेल. त्या दिवसाची मी वाट पाहतोय. तेव्हासाठी करायचा सिनेमा मी आज लिहायलादेखील घेतला आहे’, अशी प्रतिक्रिया ‘मुंटा’ला नाव न लिहिण्याच्या अटीवर हिंदी-मराठीतील प्रस्थापित दिग्दर्शकानं दिली.

सावनीच्या हेतूंना यश, कोळींच्या सुखी कुटुंबात फूट, आरतीच्या बाळाचा बाप लकीच! मुक्ताला विश्वास
राजकीय अंक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनावर आधारित नाटक लवकरच रंगभूमीवर सादर होणार आहे. २०२२ साली शिवसेना फुटीच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेलं हे नाटक असल्याचं बोललं जातंय. ‘मला काही सांगायचंय’ असं शीर्षक असलेल्या या एकपात्री नाटकात अभिनेता संग्राम समेळ हा एकनाथ शिंदे यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. डॉ. प्रदीप ढवळ यांनी या नाटकाचं लेखन केलं आहे. हे पुस्तक ‘कर्मयोगी’ या पुस्तकावर आधारित आहे. दुसरीकडे ‘५० खोके एकदम ओक्के’ या आणखी एका नाटकाच्या पोस्टरची चर्चा आहे. पोस्टरवर काय ते रस्ते, काय ते खड्डे, तरीपण म्हणायचं एकदम ओक्के, असं लिहिण्यात आलं आहे. तसंच कलाकारांच्या नावाच्या इथेही ‘सरड्यालाही लाजवतील असे रंग बदलणारे…’ असा आशय लिहिण्यात आला आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणातील नाट्य आता मराठी रंगभूमीवरही पाहायला मिळणार असल्याचं म्हटलं जातंय.

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ” महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत. ऑनलाइन पत्रकारिता क्षेत्रात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हाताळण्याचा सहा वर्षांचा अनुभव. सामाजिक, व्हायरल तसंच मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांच्या लिखाणाची आवड.”… आणखी वाचा

Source link

dharmaveer 2 release datemaharashtra assembly electionsraj thackeray biopic movieupcoming marathi political moviesएकनाथ शिंदेधर्मवीर २मराठी राजकीय सिनेमे २०२४महाराष्ट्र विधानसभा निवडणूकयेक नंबर चित्रपटराज ठाकरे
Comments (0)
Add Comment