Dharmaveer 2 Vs Navra Maaza Navsaacha 2: सध्या बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटांमध्ये चांगलीच टक्कर पाहायला मिळाली. दोन लोकप्रिय मराठी चित्रपटांचे सीक्वेल सध्या बॉक्स ऑफिस गाजवत आहेत.
हायलाइट्स:
- धर्मवीर २ आणि नवरा माझा नवसाचा २ची बॉक्स ऑफिस कमाई
- २७ सप्टेंबर रोजी रीलिज झालाय ‘धर्मवीर २’
- ‘नवरा माझा नवसाचा २’ २० सप्टेंबरपासून चित्रपटगृहात
किती झाली कमाई?
Sacnilk च्या रिपोर्टनुसार, ‘नवरा माझा नवसाचा २’ या सिनेमाने रीलिजनंतरच्या दुसऱ्या शनिवारी म्हणजेच २८ सप्टेंबर रोजी १.५ कोटींची कमाई केली. तर या सिनेमाची दुसऱ्या रविवारी साधारण दुपारपर्यंतची कमाई १ कोटी आहे. एकूण १० दिवसात अशोक सराफांच्या या चित्रपटाने १५.३५ कोटींची कमाई केली आहे. रविवारच्या आकडेवारीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे २७ सप्टेंबर रोजी ‘धर्मवीर २’ प्रदर्शित झाला आणि या सिनेमानेही दणक्यात सुरुवात केली आहे. ‘धर्मवीर २ साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट…’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी १.७५ कोटी कमावले. तर दुसऱ्या दिवशी प्रसाद ओक स्टारर या सिनेमाने २.३५ कोटी कमावले आहेत. ‘धर्मवीर २’ने अवघ्या २ दिवसात ४.१ कोटींचा गल्ला जमवला आहे. दोन्ही चित्रपटांची मिळून या वीकेंडला मराठी सिनेमांनी घसघशीत कमाई केली आहे. Sacnilk ने ही आकडेवारी दिली आहे.
दोन्ही सिनेमांमध्ये आहे तगडी स्टारकास्ट
‘नवरा माझा नवसाचा २’च्या कास्टबद्दल सांगायचे झाल्यास यामध्ये सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, अशोक सराफ, निर्मिती सावंत, वैभव मांगले, जयवंत वाडकर या पहिल्या भागातील स्टारकास्टसह स्वप्निल जोशी, हेमल इंगळे, सिद्धार्थ जाधव, हरिश दुधाणे यांसारखे कलाकारसुद्धा आहेत. तर ‘धर्मवीर २’मध्ये प्रसाद ओक, क्षितीश दाते, स्नेहल तरडे, उदय सबनीस, आनंद इंगळे, जयवंत वाडकर, अभिजीत खांडकेकर, हार्दिक जोशी, समीर धर्माधिकारी अशी स्टारकास्ट आहे.