मराठी सिनेमांच्या सीक्वेलनी गाजवंलं बॉक्स ऑफिस! आता बॉलिवूडवर भारी पडणार प्राजक्ता-तेजस्विनी

मराठी सिनेमांना हिंदी चित्रपटांची स्पर्धा असते; असं नेहमीच म्हटलं जातं. पण अलीकडच्या काळात मराठी सिनेमांनीच हिंदीला जोरदार टक्कर देत बॉक्स ऑफिस गाजवलंय. ज्येष्ठ कलाकारांपासून आताच्या घडीचे आघाडीच्या कलावंतांपर्यंत सगळ्यांनी मराठीचा सिनेपडदा व्यापून टाकला आहे. बॉलिवूड मल्टीस्टारटर सिनेमांच्या झगमगाटात मराठी अव्वल ठरत असल्याचं चित्र आहे.

हायलाइट्स:

  • बॉक्स ऑफिसवर आवाज मराठी सिनेमांचा
  • बॉलिवूडच्या झगमगाटाला दिली जोरदार टक्कर
  • लवकरच रीलिज होणाऱ्या सिनेमांचेही आगाऊ बुकिंग दणक्यात
महाराष्ट्र टाइम्स
मुंबई टाइम्स टीम

गेल्या काही दिवसांपासून हिंदी सिनेमांची बॉक्स ऑफिसवर फारशी चर्चा झाली नाही. अनेक बड्या निर्मात्यांनी त्यांचे सिनेमे प्रदर्शित करण्यापासून अल्पविराम घेतला होता. या सगळ्यात मराठी सिनेमांनी बॉक्स ऑफिस गाजवलंय. सचिन पिळगांवकर, अशोक सराफ या ज्येष्ठ कलाकारांपासून ते स्वप्नील जोशी, प्रसाद ओक, सिद्धार्थ जाधव, क्षितिश दाते यांसारख्या हरहुन्नरी कलाकारांनी मराठीचा सिनेपडदा व्यापून टाकला आहे. ‘नवरा माझा नवसाचा २’, ‘धर्मवीर २’, ‘एक डाव भुताचा’ या सिनेमांना प्रेक्षकपसंती लाभली असून’फुलवंती’ आणि ‘येक नंबर’ या सिनेमांच्या आगाऊ बुकिंगची सुरुवात दणक्यात झाली आहे. त्यामुळे एरवी वरचढ ठरणाऱ्या हिंदी सिनेमांना मराठी चित्रपट चांगली टक्कर देताना दिसत आहेत.विशेष म्हणजे; मराठी सिनेसृष्टीतील दोन आघाडीच्या अभिनेत्री निर्मात्या म्हणून महत्त्वाचे सिनेमे घेऊन आल्या आहेत. प्राजक्ता माळी हिनं ‘फुलवंती’ हा साहित्यावर आधारित सिनेमा आणला आहे तर तेजस्विनी पंडित ‘येक नंबर’ या चित्रपटातून अनोखी आणि तितकीच हट के प्रेमकहाणी प्रेक्षकांसमोर घेऊन आली आहे. या दोन्ही सिनेमांचं आगाऊ बुकिंग बघता त्याला उत्तम प्रतिसाद लाभेल असं दिसतंय. ‘फुलवंती’ आणि ‘येक नंबर’ या दोन्ही सिनेमांच्या कथानकाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘नवरा माझा नवसाचा २’ आणि ‘धर्मवीर २’ या सिनेमांची घोडदौड कोटींच्या घरात सुरू आहे. विनोदी, चरित्रपट, प्रेमकहाणी आणि साहित्यावर आधारित कलाकृती असं वैविध्य प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

डबल धमाका

‘धर्मवीर २’ आणि ‘नवरा माझा नवसाचा २’ या दोन्ही सिक्वेल सिनेमांचा बॉक्स ऑफिसवर दणका पाहायला मिळतोय. गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला आहे. प्रसाद ओक आणि क्षितिश दाते यांच्या अभिनयानं सजलेला ‘धर्मवीर २’ हा चित्रपट समाजसेवेचा संदेश देतो. मंगेश देसाई निर्मित आणि प्रविण तरडे दिग्दर्शित हा सिनेमा आजच्या तारखेला महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनला आहे. दुसरीकडे सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘नवरा माझा नवसाचा २’ या कौटुंबिक विनोदी सिनेमानंही बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निर्मिती सावंत यांच्या विनोदाच्या अचूक टायमिंगनं सिनेमात विशेष रंगत आणली आहे. तसंच मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव यांच्या सहज अभिनयामुळे ‘एक डाव भुताचा’ हा सिनेमाही प्रेक्षकांना खळखळून हसवतोय.

दिलजित दोसांझने जर्मनीत चालू कॉन्सर्ट मध्येच थांबवली, रतन टाटांना वाहिली श्रद्धांजली; Video Viral

हिंदी सिनेमांची लाट ओसरली

अलीकडच्या काळात हिंदी चित्रपटांना अपेक्षित कमाई करता आली नाही. सणासुदीच्या काळातही हिंदी सिनेमांचं प्रदर्शन आणि त्याची कमाई विशेष झाली नाही. बॉलिवूडमधील बड्या निर्मात्यांनी त्यांच्या सिनेमांचं प्रदर्शन काही काळासाठी थांबवलं होतं. परंतु या काळात मराठी सिनेमांनी कमाल करून दाखवली. मराठी सिनेमांनी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये ‘हाऊसफुल्ल’चा नवा विक्रम रचला. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर यांसारख्या शहरांमध्ये मराठी चित्रपटांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हिंदी चित्रपटांच्या तुलनेत मराठी सिनेमांच्या निर्मितीमूल्यांमध्ये तफावत आहे; परंतु ‘माऊथ पब्लिसिटी’मुळे मराठी सिनेमे राज्यभरात दमदार कामगिरी करत आहेत.

प्रेक्षकांचा उत्साह

सध्याच्या काळात मराठी चित्रपटांना मिळणारा प्रतिसाद हा महाराष्ट्रातील प्रेक्षकांसाठी अभिमानास्पद ठरतोय. पूर्वी हिंदी सिनेमांचं अधिराज्य असलेल्या बॉक्स ऑफिसवर मराठी सिनेमांनी आज आपली एक विशिष्ट ओळख निर्माण केली आहे. जिथे हिंदी सिनेमे अडखळले आहेत, तिथे मराठी सिनेमा चांगलाच चमकत आहे. सिनेमागृह व्यावसायिकांनीदेखील मराठी सिनेमांसाठी विशेष शो लावायला सुरुवात केली आहे. हा बदल मराठी प्रेक्षकांसाठी विशेष महत्त्वाचा आहे. कमी जाहिरातबाजी असूनही मराठी सिनेमांची लोकप्रियता गगनाला भिडली आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांची ही घोडदौड अशीच सुरू राहील असं सकारात्मक चित्र दिसतंय. प्रेक्षकांचा हा उत्साह पुढील काही महिन्यांपर्यंत असाच कायम राहील; असंही जाणकार आवर्जून सांगतात.

लेखकाबद्दलजान्हवी भाटकरजान्हवी भाटकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. डिजिटल आणि टेलिव्हिजन मीडियामध्ये ५ वर्षांचा अनुभव. ‘न्यूज १८ लोकमत’मधून डिजिटल मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात. ऑनलाइन माध्यमांमध्ये ३ वर्ष कार्यरत. मनोरंजन, लाइफस्टाइल आणि अर्थ विषयात आवड…. आणखी वाचा

Source link

dharmaveer 2 navra maaza navsaacha 2 box officemarathi vs bollywood movies box office collectionphullwanti and yek number advance bookingतेजस्विनी पंडित येक नंबरधर्मवीर २नवरा माझा नवसाचा २प्राजक्ता माळी फुलवंती सिनेमामराठी अभिनेत्री झाल्या निर्मातीमराठी सिनेमा बॉक्स ऑफिस कलेक्शन
Comments (0)
Add Comment