Marathi movie box office collection: मराठी सिनेमांना हिंदी चित्रपटांची स्पर्धा असते; असं नेहमीच म्हटलं जातं. पण अलीकडच्या काळात मराठी सिनेमांनीच हिंदीला जोरदार टक्कर देत बॉक्स ऑफिस गाजवलंय. पण नुकतेच प्रदर्शित झालेले बिग बजेट सिनेमे मात्र मागे पडल्याचं दिसून येतंय.
बॉलिवूडमध्ये अनेक बड्या निर्मात्यांनी त्यांचे सिनेमे प्रदर्शित करण्यापासून अल्पविराम घेतला होता. दोन मोठे सिनेमे एकत्र प्रदर्शित केल्यानं दोघांचाही तोटा होऊ शकतो, हे ओळखल्यानं आता बॉलिवूड निर्माते ताकही फुकून पिताना दिसतायत. मात्र मराठी सिनेइंडस्ट्रीतले दोन मोठे सिनेमे एकाच वेळी प्रदर्शित झाले, त्यात बॉलिवूडचे दोन सिनेमे आहेतच. या सगळ्यामुळं दोन्ही मराठी सिनेमांना याचा फटका बसल्याचं दिसून येतंय. येक नंबर आणि फुलवंती हे दोन्ही बहुचर्चीत आणि बिग बजेट सिनेमे एका दिवसाच्या अंतरानं प्रदर्शित झाले. दोन्ही सिनेमांची कमाई फार समाधानकार नाहीये. मराठी चित्रपटही पहिल्या दिवशी कोटींची कमाई करत असताना हे दोन सिनेमे पहिल्याच दिवशी थंड पडल्याचं दिसून आलं. दोन्ही सिनेमांची कमाई ही काही लाखांच्या घरात आहे.
बिग बजेट मराठी सिनेमाचं काय चुकलं? प्रेक्षकांनी फिरवली पाठ, फुलवंती आणि येक नंबर सिनमाची पाच दिवसांत इतकीच कमाई
फुलवंती सिनेमाची कमाई किती?
प्राजक्ता माळीची निर्मिती असलेल्या फुलवंती सिनेमानं पाच दिवसांत १ कोटी ५४ लाखांची कमाई केली आहे. तर वर्ल्डवाइड कमाई ही १ कोटी ७३ लाखांच्या घरात आहे.
सिनेमाची भव्यता, झालेला खर्च यावरून या सिनेमाची कमाई फारच कमी आहे. एकाही दिवशी सिनेमाचं केलक्शन हे कोटींमध्ये झालं नाही.
येक नंबर सिनेमानं किती जमवला गल्ला?
तर राज ठाकरे यांचं कनेक्शन असलेला येक नंबर हा सिनेमाही कमाईच्या बाबतीत मागे पडलाय. या सिनेमानं सात दिवसात एक कोटींच्या जळपास कमाई केली आहे. या सिनेमावरही बराच खर्च करण्यात आला आहे. सिनेमाचं बजेट मोठं असलं तरी त्या तुलनेत कमाई फारच कमी झाली आहे.