भाजपचं वर्चस्व, आघाडीला धोक्याचा इशारा, उत्तर मुंबईतील विधानसभा मतदारसंघांची स्थिती काय?

North Mumbai Lok Sabha Election: काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून गोयल यांना मिळालेले साडेतीन लाखांचे मताधिक्य लक्षात घेता महायुती व खास करून भाजपला येथील बहुतांश जागांवर विजयाची खात्री वाटते.

महाराष्ट्र टाइम्स
उत्तर मुंबईतील विधानसभा क्षेत्रातील सहा मतदार संघातील आढावा

मुंबई: या मतदारसंघाने आत्तापर्यंत अनेक केंद्रीय मंत्री दिले आहेत. इतकेच नव्हे, तर अनेक दिग्गजांच्या उमेदवारीमुळे हा मतदारसंघ नेहमीच चर्चेचा विषय राहिला. मुंबईच्या या बहुचर्चित उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात बोरिवली, दहिसर, मागाठाणे, कांदिवली पूर्व, चारकोप आणि मालाड पश्चिम या मतदारसंघाचा समावेश असून या लोकसभा मतदारसंघात महायुतीचे वर्चस्व पहायला मिळते. या सहापैकी पाच मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे चार आणि शिवसेनेच्या एका आमदाराचा समावेश आहे. मालाड मतदारसंघात महाविकास आघाडीतील काँग्रेसचा आमदार आहे. भाजप नेते, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल हे या मतदारसंघाचे संसदेत प्रतिनिधित्व करतात. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून गोयल यांना मिळालेले साडेतीन लाखांचे मताधिक्य लक्षात घेता महायुती व खास करून भाजपला येथील बहुतांश जागांवर विजयाची खात्री वाटते.

भाजपचे दीर्घकाळापासून वर्चस्व – बोरिवली

भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या या मतदारसंघात १९७८ पासून भाजपने वर्चस्व कायम ठेवले आहे. राम नाईक, हेमेंद्र मेहता, गोपाळ शेट्टी, विनोद तावडे यांसारख्या पक्षातील अनेक नेत्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. सध्या सुनील राणे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. या मतदारसंघात गुजराती, मारवाडी आणि जैन मतदारांची संख्या लक्षणीय म्हणजे, जवळपास ४० टक्क्यांहून अधिक आहे. मुंबईतील इतर मतदारासंघाच्या तुलनेत ही आकडेवारी सर्वाधिक मानली जाते. त्यापाठोपाठ २० ते २५ टक्के मराठी मतदार आणि उर्वारित मतांध्ये दक्षिण भारतीय, मुस्लिम आणि उत्तर भारतीय अशा २० ते २५ टक्के मतदारांचा समावेश आहे. गेल्या काही निवडणुका लक्षात घेता या मतदारसंघातून उमेदवार बदलाची परंपरा भाजपने कायम ठेवली आहे. ही परंपरा यंदाही कायम ठेवली जाण्याची शक्यता आहे. मूळ दक्षिण मुंबईतील रहिवासी असणारे सुनील राणे यांना यंदा पुन्हा या मतदारसंघातून संधी मिळण्याची शक्यता तशी धूसर असून माजी खासदार गोपाळ शेट्टी यांना संधी देऊन त्यांचे राजकीय पुनवर्सन केले जाण्याची जोरदार शक्यता वर्तवली जात आहे. त्याशिवाय प्रवीण दरेकर, गणेश खणकर आदी पर्यायांचा विचार केला जात आहे. त्यातच या मतदारसंघाची परंपरा लक्षात घेता महाराष्ट्र भाजपातील काही प्रमुख नेत्यांची नावेही या मतदारसंघासाठी चर्चेत आहेत. दुसरीकडे, महाविकास आघाडीकडून या जागेवर सध्या कोणत्याही पक्षाने दावा केलेला नाही. सध्या तरी या मतदारसंघावर शिवसेना उबाठा दावा करू शकतो, अशी चर्चा आहे. परंतु काँग्रेसच्या वाट्याला हा मतदारसंघ आल्यास लोकसभेतील उमेदवार भूषण पाटील यांनाच पुन्हा संधी दिली जाऊ शकते, असे बोलले जात आहे.

आघाडीकडून शिवसेना उबाठाला संधी? – दहिसर

२०१९च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपच्या मनीषा चौधरी निवडून आल्या होत्या. २०१९मध्ये त्यांना जवळपास ६३ हजार ९१७ मते मिळाली होती. एकूण मतांच्या जवळपास ६४.८७ टक्के मते त्यांना मिळाली होती. त्यातच लोकसभा निवडणुकीतही या मतदारसंघातून पीयूष गोयल यांना ६० हजारांहून अधिकचे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे महायुतीसाठी या मतदारसंघात चांगले वातावरण आहे. या मतदारसंघातील एक गट मनीषा चौधरी यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी करीत होता, मात्र भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत या मतदारसंघातून मनीषा चौधरी यांनाच स्थान दिल्याने या शक्यतांना पूर्णविराम मिळाला आहे. महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ शिवसेना उबाठाकडे जाणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. या मतदारसंघातून शिवसेना उबाठाकडून विनोद घोसाळकर यांना संधी दिली जाऊ शकते. दिवंगत नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर या मतदारसंघातून घोसाळकर कुटुंबीयांना सहानुभूती मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे त्यांचे नाव आघाडीवर असून त्यांच्याशिवाय अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी यांचेही नाव चर्चेत आहे. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत घोसाळकर यांनी चौधरी यांच्याविरोधात नशीब आजमविले होते. त्यावेळी घोसाळकर यांना ३८ हजार ६६० तर, चौधरी यांना ७७ हजार २३८ मते मिळाली होती. त्यामुळे यंदा घोसाळकर यांना उमेदवारी दिल्यास मतदारसंघातील त्यांना असलेली सहानुभूती आणि मराठी मते यामुळे त्यांना यश मिळते का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

मराठी मतांचे समीकरण निर्णायक – मागाठाणे


शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. महायुतीच्या प्रमुख मतदारसंघापैकी हा एक मतदारसंघ मानला जातो. प्रकाश सुर्वे यांची आमदारकीची दुसरी खेप असून तिसऱ्या कार्यकाळासाठी त्यांनाच संधी दिली जाणार हे जवळपास नक्की आहे. त्यातच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पीयूष गोयल यांना या मतदारसंघातून १ लाख १ हजार ३२१ तर, भूषण पाटील यांना ५५ हजार ४१३ मते मिळाली होती. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचाही या मतदारसंघावर डोळा आहे. प्रवीण दरेकर या मतदारसंघातून इच्छुक असल्याचे सांगितले जाते. मात्र जागावाटपाच्या चर्चेत ही जागा प्रकाश सुर्वे यांच्या वाट्याला जाण्याची दाट शक्यता असल्याने त्यांनी इतर मतदारसंघांकडे मोर्चा वळल्याचे कळते. या मतदारसंघातील मराठी मतांची बेरीज लक्षात घेता शिवसेना उबाठा मोठ्या ताकदीने या मतदारसंघात मैदानात उतरला आहे. शिवसेना उबाठाकडून या ठिकाणी विलास पोतनीस, माजी नगरसेवक उदेश पाटकर, माजी नगरसेवक योगश भोईर, माजी नगरसेवक संजय घाडी आणि माजी नगरसेविका संजना घाडी यांचेही नाव चर्चेत आहे. त्यातच मराठी मतांचे मताधिक्य लक्षात घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. मनसे मैदानात उतरल्यास मतविभाजनाचा फटका कुणाला बसतो, यावर येथील निकाल अवलंबून असणार आहे.
लाडक्या बहिणींना ५ हजारांचा दिवाळी बोनस; सोशल मीडियावर पोस्ट Viral, खरंय की अफवा? जाणून घ्या

महायुतीसाठी सुरक्षित मतदारसंघ – कांदिवली

उत्तर मुंबईतील या विधानसभा मतदारसंघातही यंदाच्या लोकसभेत पीयूष गोयल यांना सुमारे १ लाख ८ हजार ५३६ मते मिळाली होती. त्या तुलनेत महाविकास आघाडीच्या भूषण पाटील यांना ३८ हजार ६३१ मते मिळविता आली. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत अतुल भातखळकर यांना ८५ हजार १५२ मते मिळाली होती. मात्र अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला या मतदारसंघात अधिक मते मिळाल्याने उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील हा मतदारसंघही महायुतीसाठी सुरक्षित मानला जातो. सध्या भाजपाचे अतुल भातखळकर हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत या मतदारसंघातून भातखळकर यांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसला सुटण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या एकूण आठ इच्छुकांनी या मतदारसंघासाठी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. अंजाठा यादव यांच्यसह सुदर्शन सोनी यांच्या नावाचा इच्छुकांमध्ये समावेश असला तरी महायुतीचे उमेदवार पाहता आणि लोकसभेतील मताधिक्य लक्षात घेता काँग्रेसच्या उमेदवारांना प्रचंड मेहनत करावी लागणार हे निश्चित.

… तर मतविभागणी अटळ – चारकोप

सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भारतीय जनता पक्षाचे योगेश सागर करतात, या लोकसभा निवडणुकीत पीयूष गोयल यांना या मतदारसंघातून बोरिवली पाठोपाठ चारकोपमधून सर्वाधिक मते मिळाली होती. साधारण १ लाख २५ हजार ६३५ मते या मतदारसंघातून गोयल यांना मिळाली होती. गेल्यावेळी विधानसभा निवडणुकीतही या मतदारसंघातून योगेश सागर यांना एकूण मतांच्या ७२ टक्के मते मिळाली होती. यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा योगेश सागर यांनाच संधी देण्यात आली आहे. या मतदारसंघात सुमारे ४० टक्क्यांपेक्षा जास्त मराठी मते आहेत. तर जवळपास २० ते २२ टक्के मते ही गुजराती समाजातील असल्याचे दिसते. परिणामी, याठिकाणी महाविकास आघाडीकडून मराठी चेहरा दिल्यास या मतदारसंघातील मतांचे विभाजन होऊ शकते. या मतदारसंघातील मराठी मते लक्षात घेता महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शिवसेना उबाठाच्या वाट्याला जाऊ शकतो. सध्या या मतदारसंघासाठी शिवसेना उबाठाकडून उमेदवार निश्चित झाला नसला तरी तेथे मराठी उमेदवाराला पसंती दिली जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.

आघाडीसाठी धोक्याचा इशारा – मालाड पश्चिम

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील मालाड पश्चिम हा एकमेव मतदारसंघात महाविकास आघाडीचे अस्लम शेख हे आमदार आहेत. गेल्या १५ वर्षांपासून अस्लम शेख या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यानंतरही लोकसभा निवडणुकतही या मतदारसंघातून भूषण पाटील यांना अवघ्या ९३५ मतांची आघाडी मिळाली. मात्र लोकसभेपेक्षा विधानसभेला शेख यांची कार्यपद्धती वेगळी असेल, त्यामुळे येथून पुन्हा एकदा अस्लम शेख यांनाच उमेदवारी दिली जाईल, हे जवळपास निश्चित आहे. या मतदारसंघात जवळपास ३० टक्के मुस्लिम आणि ३५ टक्के मच्छिमार आहेत. त्यामुळे विधानसभेची रणनीती आखताना हे समीकरण लक्षात घ्यावेच लागते. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून रमेशसिंग ठाकूर यांना उमेदवारी दिली गेली होती. ठाकूर यांना २०१९मध्ये जवळपास ६९ हजार ९२ मते मिळाली. लोकसभा निवडणुकीत महायुतीला या मतदारसंघातून ८८ हजार ३७५ मते मिळाली. त्यामुळे भाजपच्या आशा या मतदारसंघाबाबत पल्लवित झाल्या आहेत. भाजपकडून यावेळी या मतदारसंघातून विनोद शेलार यांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, या मतदारसंघासाठी मराठी मते लक्षात घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही उमेदवार देऊ शकते, अशी शक्यता वर्तविली जात आहे. त्याशिवाय, अस्लम शेख यांना टक्कर देण्यासाठी काही मुस्लिम अपक्ष उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाण्याची दाट शक्यता आहे.

लेखकाबद्दलसौरभ शर्मागेली १४ वर्षे पत्रकारिता क्षेत्रात काम करत असून प्रिंट मीडियाचा अधिक अनुभव आहे. महानगर, नवशक्ति, लोकमत, सामना या संस्थांमध्ये प्रिंट मीडियात काम करतानाच गेल्या सहा वर्षांपासून ऑनलाईन पत्रकारितेकरिता व्हिडिओ करणे, राजकीय घडामोडींवर भाष्य करणे, राजकारणी व्यक्तींच्या मुलाखती घेणे याचाही दांडगा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधील ही दुसरी इनिंग असून पहिल्या इनिंगमध्ये शैक्षणिक बातम्यांवर भर होता आता गेली ३ वर्ष महाराष्ट्र टाइम्सच्या राजकीय बातम्यांची जबाबदारी सांभाळत असून काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, समाजवादी पक्षासह इतर अनेक पक्षांचे राजकीय वार्तांकन करत आहे…. आणखी वाचा

Source link

Borivalicharkopdahisar vidhan sabhamaharashtra elections 2024Maharashtra vidhan sabha nivadnukmahayuti governmentprakash surveउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघभाजपमुंबई बातम्या
Comments (0)
Add Comment