Shiv Sena Candidate List: विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात ४५ जणांच्या नावांचा समावेश आहे. यात बहुतांश आमदारांचा समावेश आहे.
रविंद्र वायकर यांनी २००९ पासून जोगेश्वरी पूर्वची जागा राखली आहे. सलग तीन टर्मचे राहिलेले वायकर उद्धव ठाकरेंचे विश्वासू होते. त्यांच्या मागे तपास यंत्रणांचा ससेमिरादेखील लागला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेसेनेत प्रवेश केला. शिंदेंनी त्यांना लगेचच वायव्य मुंबईतून उमेदवारी दिली. अतिशय घासून झालेल्या लढतीत वायकरांनी ठाकरेसेनेच्या अमोल कीर्तीकर यांचा अवघ्या ४८ मतांनी पराभव केला. ते खासदार झाले.
वायकर खासदार झाल्यानं जोगेश्वरी पूर्वची जागा रिक्त झाली. भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी जोगेश्वरी पूर्वची जागा मिळावी यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. मुंबई महापालिकेत चार वेळा नगरसेविका म्हणून काम करणाऱ्या उज्ज्वला मोडक जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून लढण्यास उत्सुक होत्या. त्यांनी फडणवीस यांची भेट घेतली होती. जागावाटपात ही जागा भाजपकडे घ्या, अशी त्यांची मागणी होती.
उज्ज्वला मोडक यांनी उमेदवारी मागताना लोकसभा निवडणुकीतील आकडेवारीचा आधार घेतला होता. रविंद्र वायकर यांना लोकसभेला त्यांच्याच मतदारसंघातून आघाडी मिळालेली नव्हती. ते भाजप आमदारांच्या मतदारसंघातून मिळालेल्या आघाडीवरच निवडून आले आहेत. त्यामुळे जोगेश्वरी पूर्वची जागा भाजपला मिळावी, असं मोडक म्हणाल्या होत्या.
Eknath Shinde: इच्छुक फडणवीसांच्या दारात, शिंदेंनी तिकीट दिलं घरात; बालेकिल्ला राखत ‘रिक्त’ जागेवर भाजपला शह
भाजप जोगेश्वरी पूर्वसाठी आग्रही असताना शिंदेंनी शिवसेनेची पारंपारिक जागा राखली आहे. पहिल्याच उमेदवार यादीतून त्यांनी जोगेश्वरी पूर्वसाठी उमेदवार दिला आहे. वायकर यांच्या पत्नी मनिषा यांना जोगेश्वरी पूर्वेतून संधी देण्यात आली आहे. मनिषा वायकर यांना तिकीट देत शिंदेंनी जोगेश्वरी पूर्वची जागा सेनाच लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.