Aaditya Thackeray: विधानसभा निवडणुकीसाठी शिंदेसेनेनं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात ४५ जणांचा समावेश आहे. पण मुख्यमंत्री शिंदेंनी अद्याप तरी वरळीतून उमेदवार दिलेला नाही.
अभिनेता सुशांत शेलारनं शिंदेसेनेकडून वरळीची जागा लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी वरळीसोबतचे त्यांचे ऋणानुबंध सांगितले. ‘मी वरळीतील एक सामान्य नागरिक आहे. कमला मीलमध्ये काम करणाऱ्या एका सामान्य कामगाराचा नातू, टेलिकॉम फॅक्टरीत काम करणाऱ्या एका सामान्य कामगाराचा मुलगा आहे. इथेच मी लहानचा मोठा झालो,’ अशा शब्दांत शेलार यांनी वरळीसोबतचे त्यांचे बंध उलगडले.
‘जुन्या पोस्टाच्या चाळीतील ८ बाय १० च्या खोलीत माझं बालपण गेलं. अभिनय क्षेत्रातील प्रवास मी इथूनच सुरु केला, तसाच बालशिवसैनिक म्हणूनही माझा प्रवास सुरु झाला. सामान्य वरळीकरांच्या मूलभूत प्रश्नाची मला जाण आहे. ते प्रश्न सोडवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन,’ असं शेलार म्हणाले. त्यांनी वरळी मतदारसंघावर दावा सांगितला. आता मुख्यमंत्री शिंदे काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं आहे.
मनसेनं २०१९ मध्ये वरळीत उमेदवार दिलेला नव्हता. आदित्य ठाकरे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरत असल्यानं त्यांचे काका राज ठाकरेंनी वरळीत उमेदवार दिला नाही. पण यंदा राज यांनी त्यांचे विश्वासू शिलेदार संदीप देशपांडे यांना वरळीतून उमेदवारी जाहीर केली आहे. देशपांडे यांनी काही दिवसांपूर्वीच व्हिजन वरळी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्या कार्यक्रमाला मनसे प्रमुख राज ठाकरे हजर होते.
Aaditya Thackeray: वरळीत हायप्रोफाईल फाईट, आदित्य ठाकरेंसमोर मराठी अभिनेत्याचं आव्हान? CMच्या निर्णयाकडे लक्ष
वरळीत महायुतीला अद्याप तगडा उमेदवार सापडलेला नाही. भाजपच्या नेत्या शायना एनसी यांच्या नावाची चर्चा वरळीसाठी सुरु आहे. त्यांच्या नावाची चाचपणी भाजपकडून सुरु आहे. वरळीतील राजकीय, सामाजिक गणितं पाहता त्या शिवसेनेत प्रवेश करुन विधानसभा लढतील, अशाही शक्यता वर्तवल्या जात आहेत.