Raj Thackeray Sharad Pawar In Thane : गुरुवारी ठाणे जिल्ह्यात दिग्गज नेते येणार आहेत. देवेंद्र फडणवीस कल्याण आणि मुरबाडमध्ये येणार असून राज ठाकरे ठाणे आणि डोंबिवलीत येणार आहेत. तर शरद पवारही गुरुवारी मुंब्रा शहरात येणार आहेत.

उमदेवारांसाठी फडणवीसांची उपस्थिती
कल्याण पूर्वेतून भाजपने सुलभा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली असून उद्या गुरुपुष्यामृत योग आहे. या मुहूर्तावर भाजप उमेदवार सुलभा गायकवाड आणि मुरबाड मतदार संघांचे आमदार किसन कथोरे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती असणार असून उपमुख्यमंत्री आधी कल्याणमध्ये येतील, नंतर मुरबाडला जातील. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण आणि महायुतीचे इतर नेतेही यावेळी उपस्थित असतील.
राज ठाकरे उद्या ठाण्यात
तर ठाण्यातून मनसे नेते अविनाश जाधव आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून मनसेचे आमदार राजू पाटील हे देखील उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उपस्थित राहणार असल्याचे दस्तुर खुद्द राज ठाकरे यांनीच डोंबिवलीत जाहीर केले होते. परवा झालेल्या राजू पाटील यांच्या निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यात राज ठाकरे यांनी आपण राजू पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार राज ठाकरे उद्या उपस्थित राहून मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनोबल आणखी वाढवणार आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आमदार राजू पाटील यांची दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे. त्यावेळी स्वतः ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येणार असल्याचे सांगितल होतं. गुरुवारी मनसे आमदार राजू पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे दुपारी १ वाजता डोंबिवलीत येत आहेत, अशी माहिती मनसे जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर यांनी दिली आहे.
ठाण्यात दिग्गज नेत्यांची गर्दी; एकाच दिवशी फडणवीस, राज आणि शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात
जितेंद्र आव्हाडांचा अर्ज भरताना शरद पवार उपस्थिती राहणार
तर मुंब्रा – कळवा मतदार संघातून पुन्हा एकदा आमदार जितेंद्र आव्हाड निवडणूक लढवणार असून गुरुवारी सकाळी ते फॉर्म भरणार आहेत, यावेळी शरद पवार हजर राहणार आहेत, त्यामुळे शरद पवार गटाकडून एकप्रकारे शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे.