Rajura Assembly Constituency: राजुरा विधानसभा मतदारसंघात सध्या विकासाचे नव्हे तर वयाचे राजकारण सुरू झाले आहे. आमदार सुभाष धोटे आणि वामनराव चटप यांच्यात एकमेकांच्या वयावरून खडाजंगी सुरू आहे.
मोदी आलेत तरी लढत धोटे आणि चटपातच…
लोकसभा निवडणूक असो की विधानसभा या दरम्यान तिसऱ्या आघाडीची चर्चा होते.या विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडी अस्तित्वात आली आहे. परिवर्तन महाशक्तीत समाविष्ट असलेल्या स्वतंत्र भारत पक्षाचे राजुरा विधानसभा मतदारसंघांचे उमेदवार ऍड.वामनराव चटप यांनी गोंडपिपरी येथे पत्रकारांची संवाद साधला. सोशल मीडियातून विरेाधक त्यांच्या वयावरून तोंडसुख घेत आहेत.याला उत्तर देताना चटप म्हणाले, आमदार सुभाष धोटे आपल्यापेक्षा सात महिन्यांनी मोठे आहेत. ते निवडणूक लढू शकतात. मी तर त्यांच्यापेक्षा वयाने लहान आहे.मग माझ्याबाबतच हा आक्षेप का? असे चटप म्हणाले. या विधानसभा मतदारसंघात चटप विरुद्ध धोटे अशी लढत होणार आहे. येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी जरी आलेत तरीही भाजपा तिसऱ्या क्रमांकावर असेल असा टोलाही चटप यांनी भाजपाला लगावला.
चालण्याची, धावण्याची स्पर्धा ठेवा
वामनराव चटप यांनी तब्बल ३ वेळा राजुरा विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले. या काळात आपण काय काय केले याचा त्यांनी पाढाच वाचला. राजुरा विधानसभा मतदारसंघात 472 गावांचा समावेश आहे. या मतदारसंघातील गावागावांची माहिती वामनराव चटप यांना आहे. मतदारसंघातील कोणत्याही गावातील चौकात आमदार सुभाष धोटे व वामनराव चटप यांनी एकत्र येत कुठलाच आधार न घेता गावांची यादी बनवावी. दुध का दुध पाणी का पाणी होईल असे सांगत त्यांनी आमदार धोटे यांना आव्हान दिले. वयाची चर्चा करणा-यांनी चालण्याची,धावण्याची स्पर्धा करावी आम्ही तयार आहोत, असेही चटप म्हणाले.