Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातच महायुतीत तिढा निर्माण झाला आहे. भाजपनं प्रसिद्ध केलेल्या उमेदवार यादीनंतर शिंदेसेनेत नाराजी आहे.
जागावाटपात असलेला तिढा सोडवण्यासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. या बैठकीत शिंदेंनी फडणवीस यांच्याकडे कल्याण पूर्व मतदारसंघाचा विषय काढला. भाजपनं कल्याण पूर्वेतून आमदार गणपत गायकवाड यांचं तिकीट कापून त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना तिकीट दिलं आहे. गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात शिंदेसेनेचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. तेव्हापासून शिंदेसेनेचा गणपत गायकवाड यांच्यावर रोष आहे. आता भाजपनं त्यांचं तिकीट कापलं असलं तरी त्यांच्या पत्नीलाच संधी दिल्यानं शिंदेसेनेत तीव्र नाराजी आहे.
२०१९ मध्ये शिवसेना एकसंध होती. त्यावेळी शिवसेनेनं नालासोपारा, धुळे, अचलपूर, उरण या जागा लढवल्या होत्या. पण या जागांवर आता भाजपनं उमेदवार दिले आहेत. भाजपनं शिवसेनेच्या जागा बळकावल्यानं शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी सेनेतील नाराजी फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवली आहे. वर्षा बंगल्यावर जवळपास दोन तास चाललेल्या बैठकीत दोन्ही नेत्यांनी वादग्रस्त जागांवर चर्चा केली. दोन्ही पक्ष काही जागांची आणि उमेदवारांची अदलाबदल करणार आहेत.
Eknath Shinde: हे वागणं बरं नव्हं! शिंदेंनी फडणवीसांकडे व्यक्त केली नाराजी; कारण ठरली ‘ती’ उमेदवारी
वर्षावर शिंदे आणि फडणवीस यांची बैठक होऊनही महायुतीत जवळपास २५ जागांवर तिढा कायम आहे. या जागा मुंबई, मुंबई एमएमआर, विदर्भातील आहेत. महायुतीनं अद्याप तरी जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केलेला नाही. भाजप १५५ ते १६० जागा, शिंदेसेनेला ८५ ते ९० जागा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ४५ ते ५० जागा सुटण्याची शक्यता आहे. महायुतीमधील तिन्ही पक्षांनी आतापर्यंत प्रत्येकी एक उमेदवार यादी प्रसिद्ध केलेली आहे.