Nana Patole On Uddhav Thackeray: मुंबईतील शिवसेनेच्या काही जागांवर काँग्रेसने जाणीवपूर्वक दावा केल्यामुळे ही चर्चा अधिक ताणल्याची माहिती शिवसेना (उबाठा) तसेच राष्ट्रवादी (शप) या पक्षांच्या नेत्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना दिली.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील पक्षांकडून उमेदवारांची घोषणा करीत महाविकास आघाडीपूर्वीच करत महायुतीने त्यांच्यातील सामंजस्य दाखवून दिले. मात्र युतीतील तिन्ही पक्षांनी पहिली यादी जाहीर केल्यानंतरही महाविकास आघाडीचे अद्याप जागावाटपसुद्धा निश्चित झालेले नाही. महायुतीच्या अनेकांनी प्रचाराचा नारळही फोडला. मात्र महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये अद्याप चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच राहिल्याने आघाडीमध्ये बिघाडीच्या चर्चेला सुरुवात झाली. आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता नसली तरी या चर्चांमुळे महाविकास आघाडीचा जनाधार व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी तयार झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज जागावाटपासाठी बैठका आयोजित करूनही यावर तोडगा न निघाल्याने सामान्य कार्यकर्त्यांमध्ये मात्र निरुत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून जागावाटपाच्या चर्चेत काँग्रेस आणि शिवसेनेमधील वाद कारणीभूत असल्याची चर्चा समोर येत आहे.
शिवसेनेच्या एका नेत्याने खासगीत सांगितले की, ‘महाविकास आघडीमध्ये तिन्ही पक्षांचे नेते बैठकीला उपस्थित असतात. प्रत्येकाने इतरांच्या पक्षनेतृत्त्वाबद्दल आदर ठेवणे गरजेचे आहे. मात्र काँग्रेसकडून हा धर्म पाळला जात नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आमच्या नेतृत्त्वाचा एकेरी उल्लेख केला. त्यामुळेच संजय राऊत यांनी बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केल्यानेच राऊत आणि पटोले यांच्यात वादाची ठिणगी पडली. त्याशिवाय यापूर्वीच्या एका बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चर्चा अर्धवट सोडून तात्काळ निघून जाणे, हा इतर पक्षातील नेत्यांचा अपमान होता. त्यामुळे काँग्रेसच्या या भूमिकेमुळेच हा विषय अधिक ताणला गेला आहे.
काँग्रेसला मुंबईतील सर्व चांगल्या जागांवर दावा करायचा आहे. शिवाय त्यांना विदर्भातही शिवसेनेला जागा सोडायच्या नाहीत, यामुळे काँग्रेसच्या मनात नक्की काय आहे, हेच समजत नाही. मुंबईत वर्षा गायकवाड यांचे एक राजकारण तर राज्यात नाना पटोले यांचे दुसरेच राजकारण सुरू आहे. काँग्रेसांतर्गत गटातटाच्या राजकारणाचा व दिल्लीतील त्यांच्या हायकमांडच्या सुशेगात राहाण्याचा आघाडीच्या जागावाटपावर प्रचंड परिणाम झाला असून त्यामुळे मतदार व कार्यकर्त्यांमध्ये खूप वाईट संदेश गेल्याची खंतही राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेतृत्वाला वाटत आहे.’