Nagour Police Seized Money: नागपुरात पोलिसांनी एका व्यक्तीकडून लाखो रुपये जप्त केले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याप्रकरणाकडे अत्यंत गांभीर्याने पाहिलं जात असून पोलीस हे पैसे कुणाचे आहेत आणि त्याचा विधानसभा निवडणुकीशी काही संबंध आहे का याचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सीताबर्डी पोलिसांची परिसरात पेट्रोलिंग सुरू होती. दरम्यान, पेट्रोलिंग करत असताना सीताबर्डी पोलिसांना महाराज बागजवळ नागपूर विद्यापीठ परिसरात एक व्यक्ती संशयास्पद परिस्थितीत उभा असताना दिसून आला. त्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीकडे विचारपूस केली असता त्याचं नाव उमेश रामसिंग ऐदबान (रा. मानेवाडा) असं कळालं. त्यानंतर पोलिसांनी त्याचा वाहनाची तपासणी केली असता त्याच्या गाडीतून ७ लाख ९३ हजार ५०० रुपयांची रोकड सापडून आली.
त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात आरोपीकडून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी त्याचा जवळील पैसे कोणाचे आहेत, कुठून आणले असल्याचे विचारले असता, आरोपीकडून उडवा-उडवीची उत्तरं मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा कडून एकूण ७ लाख ९३ हजार ५०० रुपये जप्त केले. दुचाकीची किंमत समाविष्ट करुन ८ लाख ८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. जप्त केलेली रक्कम निवडणूक काळात मिळाल्यामुळे ती निवडणूक विभागाकडे पाठवली जाईल, अशी माहिती सीताबर्डी पोलिसांनी दिली.
या घटनेमुळे स्थानिक परिसरात चर्चा सुरू आहे. नागपूर पोलिसांच्या कारवाईने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की, निवडणूक काळात अशा अनियमितता आणि आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून, नागपूर पोलीस प्रत्येक प्रकारच्या परिस्थितीसाठी तयार आहेत. यामुळे पुढील निवडणुकीत पारदर्शकता आणि निष्पक्षता सुनिश्चित करण्यासाठी पोलीस प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरते.