विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यावर राज्यात आचारसंहिता सुरू आहे. पोलीस कडक नाकाबंदी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात दोन ठिकाणी मोठी रक्कम सापडली, याचाच धागा पकडत शरद पवार गटाच्या नेत्याने भाजप आणि अजित दादांच्या पक्षावर गंभीर आरोप केले आहेत.
हायलाइट्स:
- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून आचार संहितेची अंमलबजावणी सुरू आहे.
- पुण्यातील शिवापूर टोल नाक्यावर ५ कोटी रूपयांची कॅश सापडली, त्यानंतर जळगावमध्येही दीड कोटी रूपयांची कॅश आढळली.
- शरद पवार गटाच्या नेत्याने महायुतीवर गंभीर आरोप करत ३०-४० कोटी रूपये प्रत्येक मतदारसंघात वाटणार असल्याचे म्हटले आहे.
पाच कोटी त्यांचे होते असं म्हणायचं का? त्यांच्या कार्यकर्त्यांची नावं एफआयआरमध्ये समोर आली आहेत. आम्हाला समजलेल्या माहितीनुसार सहा ते सात गाड्या होत्या, एक गाडीमध्ये दोन पोती होती त्यामध्ये पाच कोटी सापडले असं ते म्हणतात. पण खऱ्या अर्थाने २५ ते ३० कोटी निधी त्यामध्ये होता. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी झाडं आणि डोंगर पाहण्यासाठी ते सर्व आमदार गेले होते. तसच भाजप असेल अजित दादांचा पक्ष असेल प्रत्येक मतदारसंघामध्ये ३०-४० कोटी रूपये खर्च करणार आहेत. त्यांचा लोकांवर विश्वास राहिलेला नाही. त्यांना असं वाटतं की पैसा ओतला की स्वाभीमानी लोकांना विकत घेता येतं. पण लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या स्वाभीमाना लोकांनी दाखवून दिलं आहे की निष्ठा विचार हे महत्त्वाचे असतात, असं म्हणत रोहित पवारांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.
संतांनी आपल्याला सांगितलं कोणताही भेदभाव न करता बंधुभाव जपत आपल्याला लढायचं असतं. त्याच विचाराने आम्ही लढत असतो, त्यामुळे पैसा कितीही ओतला तरी स्वाभीमानी नागरिक हे महाविकास आघाडीसोबत राहतील, असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीच्या कमीत कमी १८० जागा निवडून येतील, असंही रोहित पवार म्हणाले.