Shivadi Vidhan Sabha: मुंबईतील शिवडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाने अखेर विद्यमान आमदार अजय चौधरी यांच्या बाजूने कौल दिला. या मतदारसंघातून चौधरींसह सुधीर साळवी देखील उत्सुक होते.
मुंबईतील शिवडी विधानसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी द्यायची यासाठी मातोश्रीवर हायव्होल्टेज बैठक झाली. या बैठकीसाठी अजय चौधरीसह सुधीर साळवी आपल्या समर्थकांसह आले होते. बैठकीत अनिल परब, संजय राऊत,विनायक राऊतही उपस्थित होते.
शिवडीबाबत निर्णय घेण्यासाठी आज मातोश्रीवर बैठक झाली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी निष्ठावंत अजय चौधरी यांनाच पसंती दिली. दरम्यान उमेदवारी न मिळाल्याने सुधीर साळवी नाराज होऊन मातोश्री बाहेर पडले. मातोश्रीवर येताना ते ज्या कार्यकर्त्यांसोबत आले होते त्यांच्यासोबत न जाता साळवी परस्पर निघून गेले. उमेदवारी न मिळाल्याची नाराजी त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होती. शिवडी मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी साळवींच्या समर्थकांनी सिद्धिविनायकाच्या चरणी चिठ्ठी अर्पण केली होती. इतक नाही तर लालबागच्या राजाच्या चरणी देखील अशीच चिठ्ठी अर्पण करण्यात आली होती.
त्या पत्राची चर्चा
काही दिवासांपूर्वी लालबागच्या राजाच्या चरणी एक पत्र सापडले होते. ज्यात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून सुधीर साळवी हे शिवडीचे आमदार व्हावेत अशी मनोकामना व्यक्त करण्यात आली होती. या पत्राची राजकीय वर्तुळात बरीच चर्चा देखील झाली होती. विशेष म्हणजे लालबागच्या राजाचे आशीर्वाद मला अनेक वर्षापासून लाभत असल्याची प्रतिक्रिया साळवींनी दिली होती. मात्र लालबागचा राजा आणि सिद्धिविनायकाचा आशीर्वाद अजय चौधरी यांना मिळाल्याचे दिसते.
शिवडी विधानसभेचा आतापर्यंतचा निकाल
२००९- बाळा नांदगावकर (मनसे)
२०१४- अजय चौधरी (शिवसेना)
२०१९- अजय चौधरी (शिवसेना)