NCP SP Candidate List: विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये ४५ जागांचा समावेश आहे.
लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी त्यांचा राजकीय अनुभव पणाला लावत अजित पवारांना शह दिला. बारामतीत अजित पवारांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना तिकीट दिलं होतं. त्यामुळे बारामतीच्या बालेकिल्ल्यात अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती. पण शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना निवडून आणलं. अजित पवारांसाठी हा जबर धक्का मानला गेला. रायगडची जागा वगळता अजित पवारांच्या पक्षाला अन्यत्र यश मिळालं नाही.
आता विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांनी तोडीस तोड उमेदवार दिले आहेत. लोकसभेच्या निकालानंतर शरद पवारांच्या पक्षाकडे नेत्यांचा ओढा वाढला. तुतारी हाती घेण्यासाठी इच्छुकांच्या रांगा लागल्या. त्यामुळे दादा गटाच्या आमदारांविरोधात शरद पवारांनी फिल्डींग लावली. शरद पवारांनी मॅन टू मॅन मार्किंग करत अजित पवारांच्या आमदारांना रडारवर घेतलं. उमेदवारांच्या पहिल्या यादीत याची झलक दिसली आहे. कागल, इंदापूर, कळवा मुंब्रा, तुमसर, कोपरगाव, उदगीर, आंबेगाव, अहेरी, हडपसरमधून शरद पवारांनी उमेदवार दिले आहेत.
अजित पवारांची साथ देत महायुती सोबत गेलेल्या आणि सरकारमध्ये मंत्री झालेल्या छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्याविरोधात मात्र शरद पवारांनी उमेदवार दिलेले नाहीत. पवारांच्या पहिल्या यादीत भुजबळांच्या येवला आणि मुंडेंच्या परळीचा समावेश नाही. मुंडे आणि भुजबळ यांच्याविरोधात शरद पवारांना अद्याप तुल्यबळ उमेदवार सापडलेला नाही. त्यामुळे पुढील यादीत या मतदारसंघांमध्ये उमेदवार जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.
NCP SP Candidate List: पवारांची उमेदवार यादी आली; दादांच्या २ मंत्र्यांविरोधात ‘तुतारी वाजवणारा माणूस’ नाही
लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी बीडमध्ये मुंडेंना मोठा धक्का दिला. महायुतीकडून पंकजा मुंडे यांना तिकीट मिळताच शरद पवारांनी डाव टाकण्यास सुरुवात केली. अजित पवार गटात नाराज असलेल्या बजरंग सोनावणेंना त्यांनी पक्षात घेतलं. त्यांच्या मागे पूर्ण ताकद उभी केली. मराठवाड्यात जरांगे पाटील यांच्या आरक्षण आंदोलनामुळे वातावरण तापलं होतं. मराठा मतं भाजप उमेदवारांच्या विरोधात जाणार याची जाणीव असल्यानं पवारांनी सोनावणेंना उमेदवारी दिली. त्यांनी अटीतटीच्या लढतीत मुंडे यांचा पराभव केला. हा निकाल धनंजय मुंडे यांच्यासाठी धक्का मानला गेला. पंकजा यांच्या प्रचाराची धुरा धनंजय मुंडे यांच्याकडेच होती.