Nilesh Rane: विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी नीलेश राणेंनी भाजपला सोडचिठ्ठी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. आता त्यांच्यासमोर ठाकरेसेनेचे विद्यमान आमदार वैभव नाईक यांचं आव्हान असेल.
नीलेश राणे विधानसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक होते. त्यांना कुडाळमधून निवडणूक लढायची होती. पण महायुतीत ही जागा शिंदेसेनेकडे येते. त्यांना कुडाळची जागा सोडायची नव्हती. पण त्यांच्याकडे प्रबळ उमेदवार नव्हता. अखेर महायुतीत मध्यममार्ग निघाला. नीलेश राणेंनी काल शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. २३ नोव्हेंबरला नीलेशच्या विजयाचे फटाके फोडायला येईन, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे नीलेश यांची उमेदवारी जाहीर केली.
परस्परांची गरज समजून ताटातलं वाटीत करण्याचा पॅटर्न महायुतीनं लोकसभेला राबवला होता. शिरुरमधून लोकसभा लढण्यास शिंदेसेनेचे शिवाजीराव आढळराव इच्छुक होते. पण ही जागा महायुतीत राष्ट्रवादीकडे होती. त्यामुळे आढळराव यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. पण मतदारांनी त्यांना नाकारलं. इथून शरद पवारांच्या पक्षाचे अमोल कोल्हे विजयी झाले.
धाराशिव मतदारसंघातही लोकसभेला महायुतीनं असाच पॅटर्न राबवला. हा मतदारसंघही महायुतीत राष्ट्रवादीकडे होता. तिथे राजेश विटेकर लढण्यास इच्छुक होते. पण भाजपनं अर्चना पाटील यांना उमेदवारी देण्याचा आग्रह धरला. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत तिकीट मिळवलं. पण ठाकरेसेनेच्या ओमराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांचा पराभव केला.
शिरुर आणि धाराशिवमध्ये मतदारांनी ताटातलं वाटीत हा पॅटर्न नाकारला. निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलणाऱ्या उमेदवारांना मतदारांनी नाकारलं. दोन्ही जागांवर महाविकास आघाडीचे विद्यमान खासदार जिंकले. लोकसभेला फसलेला पॅटर्न आता महायुती विधानसभेत पुन्हा वापरत आहे. नीलेश राणेंनी निवडणुकीच्या तोंडावर भाजप सोडून शिंदेसेनेत प्रवेश केलेला आहे.
Nilesh Rane: नीलेश राणेंचं तिकीट नक्की; पण ‘त्या’ दोन निकालांनी राणेंपुत्रांसह दोघांची धाकधूक वाढली
महायुतीनं असाच प्रयोग गोंदियातील अर्जुनी-मोरगाव आणि सांगलीतील कवठे महाकाळमध्येही केला आहे. अर्जुनी-मोरेगावात राष्ट्रवादीच्या तिकिटावर राजकुमार बडोले लढणार आहेत. ते भाजपचे नेते होते. तिकीट मिळवण्यासाठीच ते राष्ट्रवादीत गेले. तर कवठे-महाकाळमध्ये भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढणार आहेत. महायुतीत या दोन्ही जागा राष्ट्रवादीकडे गेल्यानं बडोले, पाटील यांनी हाती घड्याळ बांधण्याचा निर्णय घेतला.