Kalamb Vidhan Sabha Politics: महायुतीच्या वाटाघाटीमध्ये कळंब मतदारसंघ कोणाच्या पारड्यात पडणार हे अद्याप निश्चित झाले नसताना येथील सस्पेन्स मात्र वाढत चालला आहे. आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचे दुसरे पुतणे रिंगणात उतरण्याची चिन्ह दिसत आहेत.
धाराशिवमधील कळंब मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून विद्यमान आमदार कैलास पाटील यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. त्यांची लढत कोणाबरोबर होईल हे अद्याप निश्चित झालेले नाही. आमदार कैलास पाटील यांची लढत शिवसेना पक्ष शिंदे गटाचे धनंजय सावंत यांच्याबरोबर होईल अशी मतदारसंघांमध्ये चर्चा असताना आता सस्पेन्स आणखी वाढला आहे. धनंजय सावंत यांचे चुलत बंधू केशव सावंत यांचे नाव आता या मतदारसंघातून पुढे येत आहे. सध्या केशव सावंत यांच्या नावाचीच चर्चा मतदारसंघात रंगली आहे.
कोण आहेत केशव सावंत
केशव सावंत हे आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचे पुतणे असून धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते माजी संचालक आहेत. तसेच भैरवनाथ उद्योग समूह संचलित प्रेरणा सहकारी साखर कारखान्याचाही कारभार तेच पाहतात. केशव सावंत यांचा धाराशिव कळंब मतदारसंघातील शेतकऱ्यांशी चांगला संपर्क आहे. कारखान्यामुळे त्यांना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे शक्य झाले. तेरणा सहकारी साखर कारखाना सभासद व ऊस पुरवठा तारक यांचा स्नेह संवाद मेळावा गेल्या महिन्यातच डोके येते पार पडला होता. त्यावेळेस आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी जिल्ह्यामध्ये साखर कारखाने जो दर देतील त्यापेक्षा ५१ रुपये जास्त दर मी देतो, असे जाहीर केल्यानंतरच लोकांमध्ये चर्चा होती की केशव सावंत यांचे नाव विधानसभेसाठी पुढे येऊ शकते.
कळंब धाराशिव मतदारसंघात महायुतीकडून अद्याप उमेदवार जाहीर झाला नसल्यामुळे सस्पेन्स वाढत चालला आहे. महायुतीतील पक्षांची यादी समोर आल्यास आमदार कैलास पाटील यांच्या विरुद्ध कोण असेल हे स्पष्ट होईल.