Maharashtra Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने विधानसभा निवडणुकीसाठीची पहिली यादी जाहीर केली. या यादीत कोपरगाव मतदारसंघातून संदीप वर्पे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट आणि शरद पवार गट यांच्यात कोपरगावच्या जागेवरून रस्सीखेच सुरू होती, परंतु गुरुवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी जाहीर झाली असून त्यामध्ये कोपरगावच्या जागेवर राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते ॲड.संदीप वर्पे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. त्यामुळे कोपरगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत पहिल्यांदाच होणार आहे. एकीकडे आशुतोष काळे आणि भाजपचे कोल्हे कुटुंबीय दोन्ही मातब्बर नेते एकत्र असून त्यांच्यापुढे महाविकास आघाडीचा उमेदवार कशी टक्कर देणार? याकडे कोपरगावसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
मविआची उमेदवारी मिळालेले संदीप वर्पे कोण?
संदीप वर्पे ज्येष्ठ नेते शरद पवारांचे खंदे समर्थक मानले जातात.ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फाउंडर मेंबर आहे. संदीप वर्पे यांनी 1995 साली विद्यार्थी काँग्रेस पासून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. त्यानंतर 1999साली राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाल्यानंतर ते राष्ट्रवादी पक्षात गेले आणि आजपर्यंत 25 वर्षाच्या कार्यकाळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विविध पद भुशवली आहेत.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव प्रदेश प्रवक्ते आणि आता जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. ते कोपरगाव नगर परिषदेचे दोन वेळेस स्वीकृत नगरसेवक राहिले. त्यांचे शिक्षण बीई सिविल आणि एलएलबी असून पेश्याने इंजिनियर आणि वकील आहे. संदीप वर्पे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या विविध पदावर काम केले. संदीप वर्पे यांच्या आई-वडिलांचे शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान असून वडील गोरख वर्पे कोपरगावातील एका महाविद्यालयात प्राचार्य होते. त्यांची आई प्रमिला वर्पे प्राध्यापिका होते. सामाजिक कार्यात आवड असलेले सुशिक्षित चेहरा म्हणून वरपे यांच्याकडे पाहिले जाते.
मटा ऑनलाईनची बातमी ठरली खरी
गेल्या 23 जुलै 2024 रोजी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते संदीप वर्पे यांनी दिल्ली येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. यावेळी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन ने 24 जुलै रोजी काळे कोल्हे यांच्या गडात पवारांचा शिलेदार तुतारी वाजवणार, या मथळ्याखाली बातमी केली होती. मध्यंतरीच्या काळात विद्यमान आमदार अजितदादा गटात असल्याने त्यांनी महायुतीच्या तिकिटावर दावा केला मात्र भाजपात असलेले विवेक कोल्हे यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले होते. शेवटी आज ॲड. संदीप वर्पे यांच्या नावावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने शिक्कामोर्तब केल्याने महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनची ती बातमी खरी ठरली.