Maharashtra Election 2024: पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघातून आबा बागुल यांनी तीन अर्ज भरले आहेत. बागुल यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि अपक्ष असे ३ अर्ज भरले आहेत.
विधानसभा निवडणूक लढविण्यावर ठाम असलेल्या माजी उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आबा बागुल यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आता येथील लढत आता रंगतदार होणार आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात पर्वती मतदारसंघ हा काँग्रेसला सोडण्यात यावा यासाठी आबा बागुल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात व अन्य नेत्यांना वारंवार भेटून साकडे घातले होते. त्यांना पक्षश्रेष्ठींनी अनुकूलता दर्शवली होती. सध्या महाविकास आघाडीचे जागा वाटप अद्याप जाहीर न झाल्याने,आबा बागुल यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसपक्ष , महाविकास आणि अपक्ष म्हणून आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
जागा वाटपात हा मतदारसंघ काँग्रेसलाच मिळणार आहे,असा ठाम विश्वास व्यक्त करताना यंदा कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढणारच आणि पर्वती मतदारसंघात परिवर्तन करणारच असा निर्धारही आबा बागुल यांनी व्यक्त केला आहे. परिणामी यंदा या मतदारसंघातील लढत रंगतदार होणार हे मात्र नक्की. जर दोनही पक्षातून उमेदवारी नाही मिळाली तर आबा बागुल हे अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत त्यामुळे पर्वती विधानसभा निवडणूक ही तिरंगी होणार हे आता नक्की झाले आहे.