Sunil Shelke Fills Nomination Form: मावळ मतदारसंघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आमदार सुनील शेळके यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांचे नाव जाहीर झाल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते. असे असताना आज सुनील शेळके यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
सुनील शेळके यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मावळ तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो लाडक्या बहिणींनी वडगाव मावळमध्ये रेकॉर्ड ब्रेक गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. ‘माझी मायबाप जनता, हीच माझी ताकद’ असल्याचे आमदार सुनील शेळके यांनी अधोरेखित केले.
दरम्यान सुनील शेळकेंनी विरोधात गेलेल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी देखील केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी सुनील शेळके म्हणाले की, मावळचे स्थानिक नेते करत असलेला विरोध हा वैचारिक नसून वैयक्तिक आहे. केवळ आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मिळाले नाही, आपले धंदे बंद होत आहेत, म्हणून हा सर्व खटाटोप सुरू असल्याचे सुनील शेळके यांनी सांगितले.
सुनील शेळकेने पैसा कमावला नाही तर जिवाभावाची माणसं कमावली. आज आलेली ही मायबाप जनता मला आशीर्वाद देण्यासाठी आली आहे. माझी मायबाप जनता हीच माझी ताकद असल्याचे सुनील शेळके म्हणाले. काही स्थानिक नेत्यांनी तर मला इशारा देखील दिल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
अजित पवारांच्या जवळचा नेता म्हणून ओळख असलेल्या नेत्याला अजितदादांनी पुन्हा संधी दिली आहे. मात्र त्यांच्या उमेदवारी जाहीर होण्याआधीच मावळ मतदारसंघात वाद उफाळला होता. तरीही शेळकेंच्या नावावरच शिक्कामोर्तब करण्यात आला. महायुतीतील जागावाटपाचा पेच सुटला असला तरीही मावळातील वाद अद्याप मावळला नसल्याचे चित्र आहे.
नामांकन अर्ज दाखल करताना शेळकेंच्या समवेत व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, माजी सभापती गणेश आप्पा ढोरे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवी, ज्येष्ठ नेते दीपक हुलावळे, भरत येवले, सुनील ढोरे यांच्यासह अनेक नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.