Savner Vidhan Sabha Nivadnuk: सावनेर विधानसभा मतदारसंघातून सुनील केदार यांची पत्नी अनुजा यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे काँग्रेसची यादी जाहीर होण्यापूर्वीच त्यांनी अर्ज दाखल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून अनुजा केदार काँग्रेसच्या तिकीटावर लढतील अशी चर्चा होती.
नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळ्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुनील केदार दोषी आढळल्यानंतर न्यायालयाने त्यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावली. त्यासह सुनिल केदार यांचे विधानसभेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच सावनेर विधानसभा मतदारसंघातून कोण लढणार याची चर्चा सुरू होती. मात्र, या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. विधानसभा निवडणुकीत सुनील केदार ऐवजी त्यांची पत्नी अनुजा केदार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीची तयारीही गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती.
विधानसभा निवडणुकीत केदार यांच्या कुटुंबातील कोणाला संधी मिळणार याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. कधी त्यांच्या पत्नी अनुजा विजयकर केदार यांचे नाव पुढे केले जात होते, तर कधी त्यांच्या दोन मुली पूर्णिमा आणि पल्लवी विधानसभा निवडणूक लढवू शकतात अशा बातम्या येत होत्या. मात्र, आता सावनेरमधून कोण निवडणूक लढवणार, हे समोर आले आहे.
विधानसभा निवडणुकीत केदार यांनी पत्नी अनुजा केदार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. केदार आणि त्यांच्या समर्थकांनीही याबाबत कामाला सुरुवात केली आहे. एकीकडे केदारचे समर्थक अनुजाच्या प्रचारात व्यस्त असताना दुसरीकडे केदारच्या गैरहजेरीचा फटकाही त्यांनी भरून काढण्याचे काम सुरू केले आहे. विधानसभा निवडणुकीत प्रचार कसा होणार, कोणते मुद्दे मांडले जाणार, प्रचाराचे स्वरूप काय असेल? या सर्व बाबींवर सखोल काम सुरू आहे.
सावनेर विधानसभा मतदारसंघ हा केदार घराण्याचा बालेकिल्ला मानला जातो. सुनील केदार १९९५ पासून सातत्याने या जागेवरून आमदार म्हणून निवडून आले आहेत. केदार १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून पहिल्यांदा आमदार झाले. यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केल्यावर ते त्यात सामील झाले. मात्र, चार वर्षांतच केदार यांनी राष्ट्रवादी सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते सावनेरमधून सातत्याने विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आहे.
२०१४नागपूर जिल्हातील १२ जागांपैकी ११ जागा भाजपला मिळाली होती. मात्र त्यावेळीही केदार यांना आपला गढ राखण्यात यश आले होते. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत केदार यांनी काँग्रेसच्या कोणत्याही बड्या नेत्याचा पाठिंबा न घेता त्यांचे उमेदवार श्याम बर्वे यांना रामटेक लोकसभा मतदारसंघातून विजयी केले होते. यावरून त्यांचा नागपूर जिल्ह्यात किती प्रभाव आहे हे यावरून समजू शकते.