Sameer Bhujbal Nandgaon Vidhan Sabha: महाविकास आघाडी सरकार असताना कांदे विरुद्ध भुजबळ असा संघर्ष रंगला होता. आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने या वादाला नवीन फोडणी मिळाली आहे.
राज्यात महायुतीत भाजप, शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी यांचा समावेश आहे. आता, नाशिकमध्ये मात्र महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात आता मिठाचा खडा पडला आहे. यापूर्वी पंकज भुजबळ यांनी दोन वेळा नांदगाव मतदारसंघाचे नेतृत्व केले. परंतु, गेल्या वेळी कांदे यांनी त्यांचा पराभव केला. त्याचा वचपा काढण्यासाठी समीर भुजबळ यांनी कांदे यांच्या विरोधात शड्डू ठोकल्याने ‘भुजबळ विरुद्ध कांदे’ वाद विकोपाला गेला आहे. महाविकास आघाडी सरकार असताना कांदे विरुद्ध भुजबळ असा संघर्ष रंगला होता. आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने या वादाला नवीन फोडणी मिळाली आहे.
गद्दार हा शब्द भुजबळांसाठी असून महायुतीत भुजबळ गद्दारी करत आहेत. भुजबळ कुटुंबाने दोन हजार कोटींचा भ्रष्टाचार केला असून त्याविरोधात मी सर्वोच्च न्यायालयात गेलो आहे. हा खटला मागे घेण्यासाठी दबावतंत्राचा वापर केला जात आहे. मी येवल्यातून निवडणूक लढण्यास तयार आहे.– सुहास कांदे, आमदार
मतदारसंघात भयभीत वातावरण आहे. मी कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीला उभे राहावे, अशी लोकांची इच्छा आहे. त्यामुळे मी नांदगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.– समीर भुजबळ, अपक्ष उमेदवार, नांदगाव