Vasubaras 2024: वसुबारसला कोणत्या गाईची पूजा केली जाते? जाणून घ्या पुराणातून महत्त्व

Importance of Cow in Puran Shastra: आपल्या देशात प्राचीन काळापासून आध्यात्मिक आणि भौतिक दृष्टिकोनातून गायीचे मोठे महत्त्व आहे. वैदिक काळात तर गायींची संख्या हा व्यक्तीच्या समृद्धीचा मानदंड असायचा. प्राचीन काळापासून गोधन ही मुख्य संपत्ती मानली जात असे आणि सर्व दृष्टीने गोरक्षण आणि गोसेवा केली जायची. पुराणात देखील गायींचा उल्लेख असून त्या पूजनीय मानलेल्या आहेत. आजही आपल्याकडे गायीची मनोभावे पूजा केली जाते. दरम्यान या लेखात जाणून घेणार आहोत पूजनीय गायींची माहिती.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Vasubaras 2024: वसुबारसला कोणत्या गाईची पूजा केली जाते? जाणून घ्या पुराणातून महत्त्व

Cows and Hinduism: धर्मग्रंथ, वेद आदी ग्रंथांमध्ये गोरक्षण, गोवैभव इत्यादींचे संदर्भही अधिकाधिक आढळतात. रामायण, महाभारत, भगवद्गीतेतही कोणत्या ना कोणत्या रूपात गायीचा उल्लेख आहे. गायीला धार्मिक आध्यात्मिक महत्त्व असले तरी गोधन ही एकेकाळी प्राचीन काळातील भारतातील कुटुंब आणि समाजाची एक महत्त्वाची संपत्ती मानली जात होती. पुराणकाळापासून गायीचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असून तिच्या पोटात ३३ कोटी देव असतात असेही म्हणतात.

कामधेनू

जेव्हा कधी पुराणात गाय असा उल्लेख येतो त्यावेळी डोळ्यांसमोर येते एकच नाव कामधेनु….. काम म्हणजे इच्छा आणि धेनू म्हणजे गाय. अर्थात इच्छा पूर्ण करणारी गाय होय. सर्व गायींमध्ये कामधेनू ही सर्वश्रेष्ठ गाय मानली जाते. समुद्रमंथनातून कामधेनू बाहेर आली होती. ही कामधेनू गाय जमदग्नी ऋषींकडे होती. तिच्यामुळे आश्रमात एक वेगळीच सुबत्ता आली होती. जमदग्नी ऋषींना कामधेनू भेट म्हणून मिळाली होती. एकदा त्यांच्या आश्रमात महिश्मतीचा राजा कार्तवीर्य सहस्त्रार्जुन आपल्या सैन्यासह आला होता. ऋषींनी त्याचे उत्तम स्वागत करून भोजनाची व्यवस्था केली. एवढ्या कमी वेळात ऋषींना हे कसं शक्य झालं असे विचारले असता जमदग्नी ऋषींनी कामधेनूबद्दल सांगितले. सहस्त्रार्जुनाने कामधेनूचे गुण ऐकल्यावर अशी गाय आपल्याकडे हवी असे त्याला वाटू लागले. त्याने जमदग्नी ऋषींकडे कामधेनूची मागणी केली पण ऋषींनी ती मागणी मान्य केली नाही.

सहस्त्रार्जुनाने कामधेनुसाठी केला ऋषींवर वार

आपल्याकडील संपत्ती देण्याची तयारी दाखवली पण तरी जमदग्नी ऋषी तयार होत नाहीत असे पाहता, सहस्त्रार्जुन क्रोधीत झाला आणि त्याने ऋषींवर वार करून त्यांचा आश्रम उद्धवस्त केला. सहस्रार्जुनाने जमदग्नींच्या आश्रमातील कामधेनू जबरदस्तीने पळवण्याचा प्रयत्न केला आणि ती रागाने स्वर्गात निघून गेली. जेव्हा भगवान परशुराम यांना समजले की, आपल्या पित्यावर सहस्रार्जुनाने वार केलाय तेव्हा त्यांनी क्रोधाच्या भरात महिश्मती नगरीवर आक्रमण करत सहस्रार्जुनाचा संहार केला. जमदग्नी ऋषींना हे समजले तेव्हा त्यांनी पुत्र परशुरामाला प्रायश्चित्य घेण्याचा उपदेश केला होता.

कशी आहे कामधेनू?

महादेवाचे वाहन असलेला नंदी कामधेनूस वेताळापासून झालेला पुत्र होय. कामधेनू रंगाने पांढरी असून चार वेद तिचे पाय आणि चार पुरुषार्थ तिचे स्तन आहेत. दत्तगुरुंच्या चरणी कामधेनू सदैव आपल्याला पहायला मिळते. पुराणकाळात कामधेनूला नंदा, सुनंदा, सुरभी, सुशीला आणि सुमन या नावाने ओळखले जाते. या पाच गायी जमदग्नी, भारद्वाज, वसिष्ठ, अगस्ती आणि गौतम या ऋषींना देण्यात आल्या होत्या.

नंदिनी

कामधेनू गायीची संतती म्हणजे नंदिनी गाय. तिने सरळ ऋषींच्या आश्रमाची वाट धरली आणि ती वशिष्ठ मुनींच्या आश्रमात राहू लागली. ज्यांच्या स्वत:च्या सर्व कामना तृप्त, पूर्ण शांत झाल्या आहेत अशा ऋषींकडे राहण्यातच खरा अर्थ आहे. याचा अर्थ ऋषी कधी काही कामधेनूकडून मागतच नाहीत असं नाही. फक्त स्वत:साठी, स्वार्थासाठी ते कधीही कामधेनूकडे याचना करत नाहीत असा विचार नंदिनीने केला होता. वशिष्ठ ऋषींच्या आश्रमात नंदिनी अगदी आनंदात राहत होती. एक दिवस कान्यकुब्जचा राजा कौशिक आपल्या तहानलेल्या-भुकेल्या सैनिकांना घेऊन वसिष्ठांच्या आश्रमात आला. हजारो सैनिक आणि राजाचे आदरातिथ्य वशिष्ठ ऋषींनी अगदी उत्तम प्रकारे केले. या संदर्भात त्याने ऋषींना विचारले असता त्यांनी नंदिनी गायीची महती सांगितली.

नंदिनीकडून राजा कौशिकाचा पराभव

राजा कौशिकांना वाटले ही नंदिनी राजवाड्यात हवी. यावर वशिष्ठ ऋषी म्हणाले, “तिची इच्छा असेल तर ती तुमच्यामागून येईल. मी तिला तसं सांगतो; पण तिचीच इच्छा नसेल तर बळाचा उपयोग करून तिला ओढत नेऊ नका. परिणाम चांगला होणार नाही.” यात राजा कौशिकाला एक आव्हान वाटलं. तो तिला बळजबरीनं नेऊ लागला. नंदिनीनं स्वत:च्या शरीरातून सशस्त्र सैनिक निर्माण करून राजा कौशिकाच्या सेनेचा पराभव केला. राजा निराश होऊन गेला. असे सांगतात की, नंदिनी गायीला मिळवण्यासाठी कान्यकुब्जचा राजा कौशिकाने तपश्चर्या केली आणि तेच पुढे ऋषी विश्वामित्र झाले.

कपिला, देवनी, भौमा, सुरभी

या गायी सुद्धा पुराणकाळात महत्त्वाच्या मानल्या जातात. वेदांमध्ये सुरभी गायीचा उल्लेख सापडतो. ती सुद्धा कामधेनू गायीची संतती आहे असे म्हणतात. सुरभी गायीच्या थेंबातून ईश्वर प्रकट झाले आणि त्यांनी संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली असेही म्हटले जाते. आपले पूर्वज गायीची सेवा करायचे, तिला देवाचं एक रुप मानलं जायचं.
ऋग्वेदाने गायीला अघन्या, यजुर्वेदात अद्वितीय तर अथर्ववेदात गाय म्हणजे संपत्तीचे घर असे म्हटले आहे. पौराणिक मान्यतेनुसार गाय साक्षात विष्णुचे रुप आहे. भगवान श्रीकृष्णाला गो चरणातून ज्ञान मिळाले असे सांगितले जाते. श्री गणपतीचे शिर छाटल्यावर शंभोशंकर यांना गाय दान करण्याची शिक्षा झाली होती. म्हणून पार्वतीमातेने गाय दान केली होती. स्कंद पुराणानुसार ‘गौ सर्वदेवमयी आणि वेद सर्वगौमय आहे असे म्हणतात.

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

diwaliWhich Cow puja in diwali festivalगोवत्स द्वादशीगोवत्स द्वादशीला कोणत्या गाईची पूजा केली जाते?
Comments (0)
Add Comment