MVA Seat Sharing: महाविकास आघाडीत जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही. तशी कोणतीही घोषणा मविआकडून झालेली आहे. ५ ते ७ जागांवर अद्याप सहमती झालेली नाही.
महाविकास आघाडीत जागावाटपाचा घोळ अद्याप कायम आहे. नेत्यांच्या बैठका सुरु आहेत. चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. पण अद्याप सहमती झालेली नाही. ५ ते ७ जागांवर एकमत झालेलं नाही. त्यामुळे या जागांवर सांगली पॅटर्न राबवला जाण्याची शक्यता आहे. तशी माहिती काँग्रेसच्या वर्तुळातून देण्यात आलेली आहे. या जागांवर ठाकरेसेना आणि काँग्रेसचा दावा आहे. त्यावर तोडगा निघालेला नाही.
विदर्भातील काही जागांबद्दल ठाकरेसेना आग्रही आहे. याशिवाय मुंबईतील काही जागांवरुनही दोन्ही पक्षांमध्ये एकमत झालेलं नाही. असं असताना ठाकरेसेनेनं लोकसभा निवडणुकीप्रमाणे या जागांवर थेट उमेदवार जाहीर केले. त्यांच्याकडून एबी फॉर्मचं वाटपही झालं. त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी आहे. जागांवर चर्चा सुरु असताना, एकमत झालेलं नसताना परस्पर एबी फॉर्म का वाटले, असा सवाल काँग्रेसकडून पत्रातून ठाकरेंना विचारण्यात आलेला आहे.
अद्याप एकमत न झालेल्या जागांवर मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यता आहे. अशा एकूण ५ ते ७ जागा आहेत. तिथल्या कार्यकर्त्यांची भूमिका, त्यांच्या भावना लक्षात घेऊन मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत. लोकसभा निवडणुकीत ठाकरेंनी चर्चा सुरु असताना सांगली, मुंबई दक्षिण मध्यच्या जागा जाहीर केल्या. या जागा काँग्रेसला हव्या होत्या. सांगलीतून विशाल पाटील, दक्षिण मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड तिकिटीसाठी आग्रही होत्या. पण चर्चा सुरु असताना ठाकरेंनी थेट उमेदवारांची यादी प्रसिद्ध करत इथून उमेदवारांची घोषणा केली होती.
MVA Seat Sharing: परस्पर AB फॉर्म का वाटले? काँग्रेसचा ‘मातोश्री’ला सवाल; ५ ते ७ जागांवर सांगली पॅटर्न?
सांगलीत काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी केली. तिथे त्यांना काँग्रेसचा छुपा पाठिंबा मिळाला. त्याचा फटका महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराला बसला. ठाकरेंचा उमेदवार तिथे पराभूत झाला. विशाल पाटील यांनी अपक्ष लढत विजय साकारला. त्यानंतर त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला.