Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचा विरोध डावलून अणुशक्तीनगरमधून उमेदवार दिला आहे. भाजपच्या विरोधाला पवारांनी फारशी किंमत दिलेली नाही.
अजित पवारांनी आज जाहीर केलेल्या जागांमध्ये अणुशक्तीनगरचा समावेश आहे. अजित पवारांनी अणुशक्तीनगरमधून सना मलिक यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्या माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांच्या कन्या आहेत. मलिक बापलेकीला अणुशक्तीनगर आणि शिवाजी नगरमधून उमेदवारी दिली जाण्याची चर्चा होती. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचे आरोप भाजप नेत्यांकडून अनेकदा करण्यात आले आहेत. मलिक यांच्याविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेनं २०२२ मध्ये कारवाई केली होती. त्यांना अटक करण्यात आली. ते अनेक महिने तुरुंगात होते.
वादग्रस्त व्यक्तींशी संबंधित कोणालाही उमेदवारी दिल्यास ते सहन केलं जाणार नाही, असा पवित्रा भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी घेतला आहे. त्यांनी मलिक यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. भाजपनं आधीही मलिक यांना तिकीट देण्यास ठाम विरोध दर्शवला होता. पण अजित पवारांनी विरोध झुगारुन देत सना मलिक यांना अणुशक्तीनगरमधून उमेदवारी जाहीर केलेली आहे. पण अजित पवारांनी नवाब मलिक यांना तिकीट दिलेलं नाही.
Ajit Pawar: ये दादा का स्टाईल है! भाजपचा विरोध झुगारला; शेवटी ‘तिकडे’ उमेदवार दिलाच, ‘लाडकी लेक’ रिंगणात
भाजपसोबत गेल्यानंतर जागावाटप आणि उमेदवार जाहीर करण्यावरुन अजित पवार गटाची अनेकदा गोची होताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपनं अजित पवारांना केवळ ५ जागा दिल्या. त्यातीत परभणीची जागा त्यांना राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांच्यासाठी सोडण्यास सांगण्यात आलं. आता विधानसभेलाही तीन पक्षांपैकी सगळ्यात कमी जागा अजित पवारांच्या गटाला सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी इच्छुक नाराज झाले आहेत.