Ajit Pawar: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना उमेदवारी अर्ज भरताना सोबत न्या, असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांच्या सगळ्या उमेदवारांना दिलेले आहेत.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्पातून जाहीर केली. या योजनेच्या माध्यमातून गरीब महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. महिलांच्या सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजना घोषित करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून अडीच कोटीपेक्षा अधिक महिलांना महिन्याला १५०० रुपये दिले जात आहेत. ही योजना विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरु शकते. योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, त्याचा प्रचार-प्रसार व्हावा म्हणून अजित पवारांनी गुलाबी रंगाचं जॅकेट घालतात. त्यांच्या कार्यक्रमांमध्ये गुलाबी रंग ठळकपणे दिसतो. आता राष्ट्रवादी त्यापुढे एक पाऊल टाकणार आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करताना लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना सोबत न्या. त्यावेळी त्यांना गुलाबी साडी परिधान करण्यास सांगा, अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्त्वाकडून सगळ्या उमेदवारांना देण्यात आल्या आहेत. उमेदवारी अर्ज भरताना आपल्या कुटुंबातील सदस्यांना सोबत नेण्याऐवजी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेल्या महिलांना न्या. गुलाबी साडी नेसलेल्या महिलांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करा, अशा सूचना राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वाकडून करण्यात आलेल्या आहेत. तसं पत्रकच पक्षाकडून काढण्यात आलेलं आहे.
लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार गुलाबी रंगाचं जॅकेट परिधान करुन विविध कार्यक्रमांना उपस्थित राहतात. लाडकी बहीण योजना, त्यातून सामान्य महिलांना मिळालेला लाभ अशा गोष्टी लोकांच्या मनात ठसवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरु आहे. आता उमेदवारांनीदेखील त्यांचा अर्ज दाखल करताना योजनेचा प्रचार करावा, ही योजना सर्वसामान्यांच्या मनावर अधिकाधिक ठसवावी, अशी पक्षाची रणनीती आहे. त्यासाठीच लाभार्थी महिलांच्या साक्षीनं उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचना राष्ट्रवादीकडून करण्यात आलेल्या आहेत.