Maharashtra Election 2024: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी झालेल्या सभेत बोलताना नितीन गडकरी यांनी फडणवीसांनी केलेल्या कामाचा गौरव केला.
नितीन गडकरी म्हणाले, “देवेंद्रजींनी महाराष्ट्रातील नागपूरच्या विकासाला प्राधान्य दिले. मला सांगायला आनंद होत आहे की, आपल्याला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली आहे. यामध्ये काँग्रेसला ६०-६५ वर्षे राज्य करण्याची संधी मिळाली. जे काँग्रेस ६० वर्षांत करू शकली नाही, ते देवेंद्रजींनी महाराष्ट्रात आणि नागपूरमध्ये करून दाखवले. गडकरी पुढे म्हणाले, “तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी नागपूरचा खासदार निवडून आलो. मला सांगायला आनंद होत आहे की, या १० वर्षात नागपूर शहरात १ लाख कोटींहून अधिक कामे झाली आहे. ते पुढे म्हणाले, “हा सगळा विकास माझ्या देवेंद्र फडणवीस किंवा चंद्रशेखर बावनकुळेंमुळे झालेला नाही. समोर बसलेल्या तुमच्यामुळेच नागपूरचा विकास झाला. जर तुम्ही आशीर्वाद दिला नसता आणि शक्ती दिली नसती तर आम्ही हे चित्र बदलू शकलो नसतो.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुढे म्हणाले की, “आता पुन्हा तुमचा आशीर्वाद मिळाल्याने नागपूर पुन्हा एकदा देशाचे सुंदर, स्वच्छ, प्रदूषणमुक्त शहर बनेल. मिहान प्रकल्पात आतापर्यंत नागपूर आणि विदर्भातील ७८ हजार भूमिपुत्रांना रोजगार मिळाला आहे. बाकीच्या नेत्यांना आपल्या मुलांच्या तिकिटाची चिंता आहे. मात्र आम्हाला नागपूरच्या तरुणांच्या रोजगाराची चिंता आहे.
महायुती सरकारने केलेल्या कामाच्या जोरावर राज्यात पुन्हा सरकार स्थापन करू- देवेंद्र फडणवीस
तसेच यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली नागपुरात झालेली विकासकामे सर्वांनी पाहिली असल्याचे फडणवीस यांनी आपल्या रोड शोमध्ये सांगितले. गेल्या १० वर्षातील आमचे काम आणि काँग्रेसच्या राजवटीत केलेले काम पहा. ते म्हणाले की, आम्ही नागपूर बदलले हे सांगण्याची गरज नाही. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी सहाव्यांदा तिकीट दिल्याबद्दल पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले. ते म्हणाले, “मला पूर्ण विश्वास आहे की जनता मला आशीर्वाद देईल. महायुती सरकारने केलेल्या कामाच्या जोरावर राज्यात पुन्हा सरकार स्थापन करू. आमचे एकच उद्दिष्ट आहे – महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी आम्ही महाराष्ट्राला दिलेली गती आवश्यक आहे.