Uddhav Thackeray: शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव असलेल्या सुधीर साळवी यांनी तातडीनं मातोश्रीवर बोलावलं आहे.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव असलेल्या सुधीर साळवी यांनी आज सकाळी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. निष्ठावंत शिवसैनिकांनो, मला तुमच्याशी बोलायचं आहे! अशा आशयाची ही पोस्ट होती. आज संध्याकाळी सुधीर साळवी त्यांच्या समर्थकांशी संवाद साधणार होते. त्यांची भूमिका स्पष्ट करणार होते. ते बंडखोरी करतील अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी त्यांना तातडीनं मातोश्रीवर बोलावलं.
सुधीर साळवींची पोस्ट पाहून त्यांचे शेकडो कार्यकर्ते संध्याकाळी लालबागचा राजा शाखेसमोर जमले. पण तितक्यात साळवींना उद्धव ठाकरेंचा फोन आला. त्यानंतर साळवी माजी नगरसेवक सचिन पडवळ यांच्यासह ठाकरेंच्या भेटीसाठी निघाले. उद्धव ठाकरे सुधीर साळवींना श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला देण्याची शक्यता आहे. साळवी आणि ठाकरे यांच्यात मातोश्रीवर बैठक सुरु आहे. मातोश्रीवरुन आल्यानंतर लालबाग राजा शाखेसमोर साळवी त्यांच्या समर्थकांना संबोधित करणार आहेत.
Uddhav Thackeray: तातडीनं मातोश्रीवर या! साळवींना ठाकरेंचा फोन; सभा सोडून निघाले, वेगवान घडामोडी सुरु
शिवडीतून विधानसभा निवडणूक लढण्यासाठी सुधीर साळवी इच्छुक आहेत. पण ठाकरेंनी इथून विद्यमान आमदार अजय चौधरी यांना तिकीट दिलं आहे. चौधरी आणि साळवी दोघेही निवडणूक लढण्यास उत्सुक असल्यानं ठाकरेंची गोची झाली. अखेर त्यांनी आपलं वजन चौधरी यांच्या पारड्यात टाकलं. पक्षात प्रचंड फूट पडलेली असताना आमदार अजय चौधरी यांनी ठाकरेंची साथ सोडली नाही. त्यामुळे ठाकरेंनी उमेदवारीची माळ चौधरी यांच्या गळ्यात टाकली. माझ्या वाईट काळात अजय चौधरी माझ्यासोबत राहिले, असं ठाकरे त्यांचा निर्णय देताना म्हणाले.