लोकसभा निवडणुकीसारख्याच घडामोडी महायुतीत पुन्हा एकदा घडू लागल्या आहेत. नाशिकमध्ये महायुतीत ठिणगी पडलेली आहे. कांदे विरुद्ध भुजबळ असा वाद उफाळून आलेला आहे.
नाशिकच्या नांदगाव मतदारसंघाचे सेना आमदार सुहास कांदे यांना पक्षानं विधानसभेसाठी पुन्हा उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना नांदगावातून निवडणूक लढायची होती. पण इथला आमदार सेनेचा असल्यानं महायुतीत ही जागा सेनेकडे गेली. त्यामुळे समीर भुजबळ यांनी बंडखोरी केली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष पदाचा राजीनामा देत आमदार सुहास कांदे यांच्याविरोधात शड्डू ठोकला आहे.
समीर भुजबळ नांदगावमधून २८ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भुजबळ थेट नांदगावातून येऊन कांदेंना आव्हान देणार असल्यानं मग कांदे समर्थकही इरेला पेटले आहेत. त्यांनी थेट येवल्यातून कांदे यांचा उमेदवार अर्ज दाखल केला आहे. कांदे समर्थकांनी येवल्यात अपक्ष अर्ज भरला आहे. त्यामुळे कांदे यंदा दोन मतदारसंघांमधून लढणार आहेत. येवल्यात ते थेट मंत्री छगन भुजबळ यांना आव्हान देतील.
भडकले कांदे, महायुतीचे वांदे; नाशकात ठिणगी, शिंदेंचा आमदार भुजबळांना नडणार, २ जागांवर लढणार
भुजबळ विरुद्ध कांदे वाद नाशिककरांसाठी नवा नाही. भुजबळ यांचे पुत्र २००९ आणि २०१४ मध्ये नांदगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. दोन्हीवेळा त्यांनी सेनेच्या उमेदवाराचा पराभव केला. २०१४ मध्ये पंकज भुजबळांनी सुहास कांदे यांना मात दिली होती. कांदे १८ हजार ४३६ मतांनी पराभूत झाले होते. पण २०१९ मध्ये कांदे यांनी भुजबळांना १४ हजार मतांनी पराजय करत विधानसभा गाठली. तर छगन भुजबळ येवल्यातून २००४ पासून सलग चारवेळा निवडून आले आहेत. सगळ्या निवडणुकांमध्ये त्यांनी शिवसेनेच्या उमेदवारांचा मोठ्या फरकानं पराभव केला आहे.