Mahadev Babar on Hadapsar Vidhan Sabha Candidate: विधानसभा निवडणुकीतील प्रमुख पक्षांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर झाल्या असून अनेक इच्छुकांमध्ये सध्या नाराजीचा सूर आहे. तर काहीजणांनी आता बंडाचा झेंडाही हाती घेतला आहे. यातच जागावाटपासोबतच पक्षातील बंडखोरीमुळे वरिष्ठांची डोकेदुखी वाढणार आहे. पुण्यातील हडपसर मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवार जाहीर करण्यात आल्याने शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांनी वेगळी भूमिका मांडली आहे.
माजी आमदार महादेव बाबर हे हडपसरमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. परंतु ही जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला सुटल्याने बाबर नाराज झाले आहेत. तर आपली भूमिका मांडण्यासाठी त्यांनी आज कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला होता. यावेळी त्यांनी मविआतील जागावाटपावर उघड नाराजी व्यक्त केली आहे.
महादेव बाबर आपल्या भाषणात म्हणाले, ‘आज केवळ मीच नाहीतर अख्खा पुणे जिल्हा नाराज आहे, शिवसैनिक नाराज आहेत. पुणे जिल्ह्यात अद्याप एकही मशाल चिन्हाचा उमेदवार दिलेला नाही. मग संपूर्ण जिल्ह्यात मशाल कशी पोहोचवावी, पक्षप्रमुखांना आमचं देणं घेणंच नसल्याचे दिसत आहे.’
यासोबतच महेश बाबर यांनी शिवसेनेतील प्रमुख नेत्यांबाबतही मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, ‘संजय राऊत यांना भेटलो तेव्हा ते म्हणाले होते की शरद पवार स्वतः सांगत आहेत, माझं नाव सर्व्हेत आघाडीवर आहे. राऊत माझ्याशी खोटं बोलले. आम्ही मातोश्रीवर ठाकरेंच्या भेटीसाठी ६ तास थांबलो होतो मात्र उद्धव ठाकरे ४० सेकंद भेटले आणि म्हणाले की प्रयत्न सुरू आहेत आणि निघून गेले.’
‘पक्षप्रमुखांनी हजारो शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडलं आहे. आम्ही महाविकास आघाडीसोबत राहणार नाही म्हणजे नाही. मी आजपासून शिवसेनेचं काम करणार नाही. आमच्याकडून आता तयारी पूर्ण झाली आहे. आम्ही लवकर वेगळा निर्णय घेऊ. एवढेच नाहीतर कार्यकर्त्यांनी म्हटले तर निवडणूक लढणार म्हणजे लढणारच, असे म्हणत बाबरांना थेट वेगळी चुल मांडणार असल्याचे जाहीर केले आहे.