Maharashtra Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या मैदानात महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपावरून जोरदार रसीखेच सुरू आहे. अशात धाराशिवमधील परंडा भूम मतदारसंघातून मोठी बातमी समोर आली आहे.
महाविकास आघाडीतील दोन घटक पक्षातील दोन्ही उमेदवारांना त्या पक्षाने एबी फॉर्म देऊन उमेदवार घोषित केल्याने आता पॉलिटिकल ट्विस्ट निर्माण झाला आहे. राहुल मोटे हे आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तयार नाहीत. ते मागे हटत नाहीत तर शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार रणजीत ज्ञानेश्वर पाटील हे आता काय भूमिका घेतात हे पाहावे लागेल.
राहुल मोटे हे परंडा भूम मतदार संघाचे तीन वेळा आमदार होते. त्यांचा त्या मतदारसंघांमध्ये जनसंपर्क दांडगा असून त्यांनी पंधरा वर्षांमध्ये विविध विकास काम केल्यामुळे त्यांचा संपर्क मोठा होता. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर ते शरद पवार यांच्याबरोबर कायम राहिले त्यांनी त्यांची साथ सोडली नाही. म्हणूनच की काय ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट याकडून उमेदवारीसाठी इच्छुक होते. त्यांनी परंडा भूम मतदारसंघांमध्ये प्रचार देखील सुरू केला होता आणि आपणच महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याचे त्यांनी अनेकदा सांगितले होते.
परंडा भूम मतदारसंघांमध्ये दोन्ही उमेदवारांना दोन्ही पक्षांनी एबी फॉर्म दिल्याने आता कुठला उमेदवार मागे आपला अर्ज घेतो आणि कुठला उमेदवार डॉक्टर तानाजी सावंत यांच्या विरोधात उभा राहतो हे आता पुढील काही दिवसांमध्ये दिसून येईल. राहुल मोटे यांनी २००४ ते २०१४ अशी सलग ३ टर्म या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१९च्या निवडणुकीत तानाजी सावंत यांनी त्यांचा पराभव केला होता.