Police Administration Action Mode in Maharashtra: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालघर पोलीस दलामार्फत पालघर जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रे व दारूसाठा बाळगणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून पालघर जिल्ह्यात आत्तापर्यंत पोलिसांनी तब्बल १०२ कारवाया केल्या असून १०८ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार घडू नये, तसेत अवैध दारुगोळा आणि शस्त्रसाठ्याच्या वाहतुकीला आळा बसावा म्हणून महाराष्ट्र राज्याच्या सीमा भागात पालघर जिल्ह्याच्या हद्दीत ९ ठिकाणी चोवीस तास नाकाबंदी करण्यात आली आहे. यामध्ये अवैध दारू तस्करी व इतर बाबी रोखण्यासाठी तपासणी करण्यात येत आहे. निवडणूक मतमोजणी होईपर्यंत पोलिस दलामार्फत सुरू असणाऱ्या या कारवाया अशाच सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.
आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पालघर जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांना पालघर जिल्ह्यात चालणारे अवैध धंदे, विनापरवाना अग्निशस्त्र बाळगणारे इसम यांच्या विरोधात कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलिसांमार्फत कारवाई करण्यात आली आहे.
घोलवड पोलीस ठाणे हद्दीत अवैधरित्या दारूसाठा बाळगणाऱ्या इसामावर स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास छापा टाकत कारवाई केली आहे. तर तलासरी तालुक्यातील वेवजी येथे एका आरोपीच्या राहत्या घराच्या परिसरात प्रतिबंधित असलेला विदेशी बनावटीचा अवैध दारूसाठा पोलिसांना आढळून आला आहे. २७ लाख १९ हजार ६८० रुपये किमतीचा अवैध दारू साठा पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी घोलवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासोबतच डहाणू तालुक्यातील दाभाडी-बोरपाडा येथे विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या आरोपींवर देखील पोलिसांनी ताब्यात घेऊन मोठी कारवाई केली असून त्याच्याकडून एक १२ बोअर बंदुक, ३ जिवंत काडतुसे, ३ रिकामी काडतुसे आणि अन्य शस्त्रे जप्त केली आहेत. य कारवाईत आरोपविरोधात कासा पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. तर मनोर पोलीस ठाणे हद्दीत चिल्हार फाटा येथील फाईव्ह स्टार ढाबा येथे दोन संशयितांकडून २ गावठी पिस्टल, ६ जिवंत काडतुसे असे एकूण ८६ हजार रूपये किमतीचे अग्निशस्त्र जप्त केले आहेत. दोन्ही आरोपी उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत त्यांच्याविरोधात मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१५ ऑक्टोबर पासून आचारसंहिता लागू झाल्यापासून ते आजपर्यंत पालघर पोलीस दलामार्फत जिल्ह्यात विविध ठिकाणी १०२ कारवाया करण्यात आल्या असून १०८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये ७ हजार १७९ लिटर देशी-विदेशी-गावठी अशी एकूण ३६ लाख ५८ हजार १३५ रुपये किमतीची अवैध दारू त्याचप्रमाणे 34 लाख 32 हजार 700 रुपये किमतीची 14 वाहने जप्त करण्यात आली आहेत. विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या आरोपींवर आर्म्स ॲक्टप्रमाणे 2 गुन्हे दाखल करण्यात आले असून 3 आरोपींना अटक करून त्यांच्याकडील 3 अग्निशस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. दुबई येथून आयात केलेली सिगरेटच्या व तंबाखू उत्पादनांच्या अवैध वाहतुकीवर कारवाई करत 4 लाख 83 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यात विविध ठिकाणी केलेल्या कारवायांमध्ये तब्बल 71 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.