Samajwadi Party in Vidhan Sabha Nivadnuk: महाराष्ट्रातील विधानसभेच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असली तरी महाविकास आघाडीतील जागावाटपाचा गुंता अद्याप सुटलेला दिसत नाही. एकीकडे मविआतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गट या तीन बड्या पक्षांनी आता ९०-९०-९० चा फॉर्म्युला ठरवला असल्याचे समजते. यातच अन्य मित्रपक्षांच्या वाट्याला किती जागा येतील हे अद्याप ठरले नाही. यातच समाजवादी पक्षाला सन्मानजनक जागा मिळाव्या यासाठी पक्षनेतृत्व जोर लावताना पाहायला मिळत आहे.
समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमींनी मविआतून ५ जागांची मागणी केली आहे. अबू आझमी यांनी शुक्रवारी शरद पवारांची भेट घेतली आहे. आपल्याला अपेक्षित जागा मिळाव्यात अशी मागणी करत उत्तरासाठी शनिवारी दुपारपर्यंत मुदत दिली आहे. शरद पवारांच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना अबु आझमी म्हणाले, ‘आम्ही ५ उमेदवार घोषित केले आहे ते जिंकून येणार असल्याचा विश्वास आहे. मी वाट बघू शकत नाही जे लोक सरकार आणायची चर्चा करत आहे ते अद्याप तिकीट वाटप करू शकलेले नाहीत. मी याच मुद्द्यावर त्यांच्याशी चर्चा केली. दुसऱ्या पक्षात एवढा मोठा उमेदवार नाही. मला याआधी काँग्रेसने दोनवेळा धोका दिला आहे. जर मला अपेक्षित जागांसाठी नकार दिला तर मी २५ उमेदवार तयार केले आहेत. माझ्याकडून ५ जागा घोषित करण्यात आल्या याव्यतिरिक्त आणखी दोन जागा द्यायला हव्यात तरच मी थांबेल.’
अबु आझमी पुढे म्हणाले, मी मुंबईत तीन जागा मागत असून अणुशक्ती नगर सोबत भायखळा आणि वर्सोवाची जागा मी मागत आहे. दुर्देव आहे की मविआकडे सध्या अल्पसंख्याक उमेदवारच नाही आहे. मी उद्या (शनिवारी) दुपारपर्यंत वाट पाहणार आहे. अन्यथा मी माझा वेगळा निर्णय घेईन आणि २५ उमेदवारांची घोषणा करेन, असा थेट इशाराच अबु आझमींनी दिला आहे.
याआधी महाराष्ट्र समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि खासदार अखिलेश यादव यांनी महाराष्ट्रात उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी समाजवादी पक्षाच्या उमेदवारांची घोषणाही केली होती. यासोबतच भाजपवर हल्लाबोल देखील केला होता. ते म्हणाले की, राज्यात भाजपची युती हरणार आहे, त्यांचा दारुण पराभव होणार आहे. मात्र महाविकास आघाडीने प्रमुख पक्षांनी सध्या प्रत्येकी ९० जागांचे सूत्र ठरवल्याने अन्य मित्रपक्षांची कोंडी होणार असल्याचे दिसत आहे. १८ जागा छोट्या पक्षांमध्ये कसं वाटप करावं याबाबात अद्यापही चर्चेचे गुऱ्हाळ सुरु आहे. मविआच्या प्रमुख नेत्यांकडून मविआत आलबेल असल्याचे सांगण्यात येत असले तरी छोट्या पक्षांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीसमोर नवे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.