Phulambri News: धान्य दारात भिजतंय अन् शेतात उभं पीक रोजच्या पावसामुळे खराब होऊन कुजतंय अशी विचित्र परिस्थिती फुलंब्री तालुक्यात दिसत आहे. त्यामुळे फुलंब्री तालुक्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे.
पावसाअगोदर काढणी करून सोंगून ठेवलेली मका; तसेच सोयाबीन वाळवत टाकलेले होते. अशा वेळीच ‘धान्य दारात भिजतंय अन् शेतात उभं पीक रोजच्या पावसामुळे खराब होऊन कुजतंय’ अशी विचित्र परिस्थिती फुलंब्री तालुक्यात दिसत आहे. त्यामुळे फुलंब्री तालुक्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. फुलंब्री तालुक्यामधील सर्व मंडळांमध्ये परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली, तर काही ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसल्याने खरिपाच्या उत्पन्नाला ग्रहण लागले आहे; परंतु रब्बी हंगामही संकटात सापडला आहे. पावसाने केलेल्या नुकसानीमुळे शेतीसाठी केलेला खर्च भरून कसा काढायचा याची चिंता शेतकऱ्यांना वाटत आहे.
तालुक्यामध्ये उभ्या असलेल्या व सोंगुन ठेवलेल्या पिकात पाणी साचले आहे. नदी-नाल्यांना पूर आल्याने अनेक शेतात पाणी शिरले आहे. फुलंब्री तालुक्यातील ५७ हजार हेक्टरपैकी २० हजार ९२७३ हेक्टर क्षेञ पावसाने बाधित झाले आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार, मागील आठवड्यात फुलंब्नी मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असुन इतर ठिकाणी अवेळी झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
कपाशी सोयाबीन, मका या पिकांना पावसाचा फटका बसला आहे. हाता तोंडाशी आलेले पीक फाटलेल्या आभाळाने गिळंकृत केले आहे; तसेच उभे व सोंगणी करून ठेवलेले सोयाबीन व मकाचे पीक पूर्णतः खराब झाले आहे. मका पिकांना कोंब फुटले आहेत, हीच परिस्थिती कापसाच्या बाबतीतही आहे. कापसाच्याही वाती झाल्या आहेत. मात्र, या परिस्थितीत बळीराजा मिळेल त्या वेळेत शिल्लक असलेली मका जमा करण्याची कसरत करीत आहे.
हवालदिल शेतकऱ्यांना वाली नाही
तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असुन पिकांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, अधिकारी व कर्मचारी निवडणूक कार्यक्रमात गुंतलेले आहेत, तर पदाधिकारी निवडणुक कामात तल्लीन आहेत. यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना सध्या कोणीच वाली नाही.