Chhagan Bhujbal: नांदगाव भयमुक्त करण्यासाठी आपण निवडणूक लढवत असल्याचे सांगत, समीर यांनी ठाम भूमिका घेतल्याने कांदे विरुद्ध भुजबळ वादाचा नवा अंक पाहायला मिळत आहे
नांदगाव मतदासंघातून सध्या महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. महायुतीत हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडे असताना भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करीत, कांदेंना आव्हान दिले आहे. नांदगाव भयमुक्त करण्यासाठी आपण निवडणूक लढवत असल्याचे सांगत, समीर यांनी ठाम भूमिका घेतल्याने कांदे विरुद्ध भुजबळ वादाचा नवा अंक पाहायला मिळत आहे. सुहास कांदे यांनी भुजबळ कुटुंबीयांवर आरोप केल्यानंतर त्याला छगन भुजबळांनीही उत्तर दिले. भुजबळ कुटुंबीयांना अनेक अडचणींतून जावे लागत आहे. त्यामुळे विचार करावाच लागतो. किती दिवस ते मला विचारतील, इकडे जाऊ का? तिकडे जाऊ का? ते आता मोठे झालेत. त्यांचे निर्णय त्यांना घेऊ द्या आणि त्यांनाही आता राजकारण कळते ना! त्यांनी काय केले पाहिजे, काय नाही, याबाबत त्यांचाही अभ्यास झाला आहे, असे सांगत भुजबळांनी समीर भुजबळांच्या उमेदवारीचे अप्रत्यक्ष समर्थन केले. कांदे यांच्या आरोपाला कोर्टात उत्तर देऊ, असेही ते म्हणाले.
कांदेंना येवल्यातून लढण्याचे आव्हान
भुजबळ गद्दार असून, त्यांना गद्दारीचा इतिहास असल्याचे कांदे यांनी म्हटले होते. तिन्ही भुजबळांनी पदाचा आणि आमदारकीचा राजीनामा देऊन बिनधास्त निवडणूक लढवावी असे आव्हान आमदार सुहास कांदे यांनी दिले आहे. परंतु, नांदगावमध्ये दहशतीचे वातावरण कोणी निर्माण केले हे कोणीही सांगेल असे सांगत, आम्ही जमिनी लाटत व खोट्या केसेस टाकत नाहीत, असा टोलाही भुजबळ यांनी कांदेंना लगावला. आमदार कांदे यांनी येवल्यात येऊन लढावे, असे आव्हानही त्यांनी दिले.