लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. जोरगेवार यांचा पाठिंबा असूनही, मुनगंटीवार यांना पक्षांतर्गत समस्या आणि उमेदवारांच्या पसंतीवरून, विशेषतः राखीव चंद्रपूर मतदारसंघातील वादांचा सामना करावा लागतो. विचारांचा महासंगम असलेले जोरगेवार आता मुनगंटीवारांना नकोसे झाले आहेत.
जोरगेवारांचा षटकार, मुनगंटीवार रन आउट…
मी शेवटचा खेळाडू, षटकार मारून विजय मिळवून देणारा, त्यामुळे कप्तान मुनगंटीवार यांनी मला शेवटी ठेवलं असं जोरगेवार यांनी मुनगंटीवार यांच्यासाठी घेतलेल्या मेळाव्यात म्हणाले होते. जोरगेवार यांनी लोकसभा निवडणुकीत मुनगंटीवारांसाठी षटकार मारला काय? हा शोधाचा विषय. मात्र मुनगंटीवार रन आउट झालेत. जोरगेवार भाजपमध्ये जातील अशा चर्चा रंगल्या आहेत. मुनगंटीवारांना जोरगेवार टीम मध्ये नकोय. जोरगेवार भाजपच्या टीममध्ये सहभागी झालेत तरी भाजप कार्यकर्ते त्यांना किती मदत करतात, हे येत्या दिवसात कळणार आहे.
मुनगंटीवारांचा ‘ तो ‘ आग्रह घातक…
चंद्रपूर विधानसभेची जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. ही जागा ब्रिजभूषण पाझारे यांना मिळावी यासाठी मुनगंटीवार प्रयत्न करताना दिसत आहेत. पाझारे भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. ते जिल्हा परिषद, पंचाय समिती सदस्य राहिले आहेत. अशातच पाझारे यांनी काही वर्षांपूर्वी केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. मुनगंटीवार यांच्यात मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिसतात. मुनगंटीवार यांचे कार्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे आहे. असे पाझारे म्हणाले होते. यामुळे आंबेडकरी समाज संतप्त झाला होता. कार्यवाही करण्याची मागणी पुढे आली होती. मुनगंटीवार यांची तुलना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी करणाऱ्या पाझारे यांच्याबाबत दलित समाजात फार सहानुभूती नाही. पाझारे यांना तिकीट देण्यात यावी हा मुनगंटीवारचा आग्रह त्यांच्यासाठी घातक ठरणारा आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. बल्लारपूर मतदार संघात दलित समाजाची संख्या मोठी आहे. त्यामुळे मुनगंटीवार यांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.