Satara Crime News: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने तासवडे टोलनाका येथे तळबीड पोलीस ठाण्याद्वारे एक पथक नियुक्त करण्यात आलं आहे.
हायलाइट्स:
- तासवडे-कराड टोलनाक्यावर वाहनांमधून १५ लाख रुपये जप्त
- सातारा पोलिसांची धडाकेबाज कारवाई
- विशेष बाब म्हणजे कार गुजरात पासिंगची
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तासवडे टोलनाका येथे तळबीड पोलीस ठाण्याद्वारे एक पथक नियुक्त करण्यात आलं आहे. हे पथक २४ तास कार्यरत असून संशयास्पद वाहनांवर नजर ठेवून आहे. यात निवडणुकीमध्ये पैशाचा वारेमाप वापर होऊ नये. तो रोखण्यासाठी ही पथके निर्माण केली असून आज पहाटेच तळबीड पोलिसांकडून विशेष कारवाई करण्यात आली. आज २६ ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटे एक ते चार वाजेच्या दरम्यान कराडहून साताऱ्याकडे जाणाऱ्या महिंद्रा बोलेरो (वाहन क्रमांक GJ 27 EE 8738) ही गाडी पोलिसांना संशयास्पद स्थितीत आढळल्यामुळे पहाटे अडीच वाजता थांबवून तपासणी केली. त्यावेळी साड्या, साहित्य असल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात आले.
पोलिस तपासणी करत असताना वाहनामध्ये १५ लाख रुपयांची रोख रक्कम मिळून आली. त्यानंतर अतिदक्षता म्हणून पोलिसांनी वाहन आणि रोख रक्कम तात्काळ तळबीड पोलीस ठाण्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगरानीखाली सुरक्षित ठेवण्यात आली. या कारवाईचा सविस्तर अहवाल तयार करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी वाहन आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलं असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गुजरात राज्याचे पासिंग असलेली ही महिंद्रा बोलेरो वाहनातून एवढी मोठी रक्कम कुठून आली? आणि ती कोणाकडे जाणार होती? याचा तपास पोलीस घेत आहेत. निवडणूक प्रोटोकॉलच्या पार्श्वभूमीवर पुढील तपासणीसाठी लिंकचा शोध घेण्यात येत आहे. निवडणूक भरारी पथकाच्या समोर पंचनामा करून ही रक्कम इन्कम टॅक्सकडे वर्ग करण्यात येणार आहे, असं पोलिसांनी सांगितले. सातारा पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली तळबीड पोलीस ठाण्याचे एपीआय किरण भोसले अधिक तपास करत आहेत.