Srirampur Vidhan Sabha Constituency: गेल्या काही महिन्यांपासून श्रीरामपूर काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू होती. विद्यमान आमदार लहू कानडेंच्या विरोधात काँग्रेसचा मोठा गट ॲक्टिव्ह झाला होता. अनेकवेळा अंतर्गत वाद चव्हाट्यावर देखील आलाय.
मोबीन खान, नगर : काँग्रेसकडून धक्कातंत्राचा वापर करत श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार लहू कानडे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. काँग्रेसकडून हेमंत ओगले यांना अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या श्रीरामपूर विधानसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. काँग्रेस श्रेष्ठींनी विद्यमान आमदाराला नाकारत नवीन चेहऱ्याला दिली संधी दिली असून ओगलेंसमोर महायुतीकडून कोण उमेदवार असणार? याकडे मतदारांचं लक्ष लागलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून श्रीरामपूर काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू होती. विद्यमान आमदार लहू कानडेंच्या विरोधात काँग्रेसचा मोठा गट ॲक्टिव्ह झाला होता. अनेकवेळा अंतर्गत वाद चव्हाट्यावर देखील आलाय. विद्यमान आमदारांच्या कार्यकाळात विकास कामे झाली नसल्याचे आरोप करत हेमंत ओगले गटाने लहू कानडेंवर टीका केली. त्यांनंतर हेमंत ओगले यांनी श्रीरामपूर विधानसभेसाठी काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न सुरू केले. भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर करन ससाणे आणि हेमंत ओगलेंनी मतदारसंघात शेतकरी युवा संवाद यात्रा काढली होती. तेव्हापासून कानडे आणि ओगलेंमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू होती. अखेर आज काँग्रेसची दुसरी यादी जाहीर झाली असून हेमंत उगले यांना काँग्रेसकडून महाविकास आघाडीची श्रीरामपूर मतदारसंघातील उमेदवारी जाहीर झाली आहे. येणाऱ्या काळात महायुतीकडून समोर कोण उमेदवार असेल आणि जनता कोणाच्या पाठीशी उभे राहणार? हे पाहणं महत्त्वाचं असेल. Raj Thackeray : एकनाथ शिंदेंविरोधात उमेदवार देणार नाही, राज ठाकरेंचा ‘मैत्रीपूर्ण’ निर्णय, पानसेंची संभाव्य उमेदवारी टळली
उमेदवारी जाहीर झालेले हेमंत ओगले कोण?
हेमंत ओगले यांनी २००७ साली काँग्रेसकडून पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्यापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली. त्यांनंतर त्यांनी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, काँग्रेसचे प्रदेश सचिव अनेक राज्याचे प्रभारी अशा विविध पदांवर काम केले. ओगले यांचे शिक्षण एमबीए पिएचडीपर्यंत झाले असून एक सुशिक्षित चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांचे वडील भुजंगराव ओगले पेशाने डॉक्टर आहे. त्यांच्या मातोश्री स्व. मंगला ओगले गृहिणी होत्या. एका सामान्य आणि सुशिक्षित घराण्यातून येत ओगले समाजकारण आणि राजकारणात आले आहे. ओगले पेशाने शेतकरी आणि दूध उत्पादक आहेत. दांडगा जनसंपर्क असलेले कार्यकर्ते म्हणून ओगलेंची ओळख आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा