Maharashtra Election 2024: विधानसभा निवडणुकीत संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मतदारसंघापैकी एक म्हणजे इंदापूर होय. येथे यावर्षी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. पाहा याचा कोणाला फायदा होणार.
इंदापुरात विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्या दहा वर्षाच्या सत्तेपढे आता हर्षवर्धन पाटील यांनी महाविकास आघाडीतून आणि प्रवीण माने यांनी अपक्ष उमेदवारीने मोठे आव्हान उभे केले आहे. दहा वर्षाच्या कामकाजामुळे येणारी नकारात्मकता आणि मोठ्या प्रमाणावर विकास कामे करून ही कार्यकर्त्यांना दिलेल्या ठेकेदारीमुळे अनेक कामे अयोग्य दर्जाची झाल्यामुळे दत्तात्रय भरणे यांच्या बद्दल नाराजी आहे. काही दिवसांपूर्वीच बूथ प्रमुखांच्या मेळाव्यात बोलताना दत्तात्रय भरणे यांना रडू कोसळले.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षात गेल्यानंतर ही आम्ही निष्ठावंत असून, देखील ऐनवेळी मात्र आमच्यावर अन्याय झाला असे सांगत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करताना आयोजित केलेल्या जाहीर सभेत प्रवीण माने आणि त्यांचे वडील सोनाई उद्योगाचे प्रमुख दशरथ माने यांना रडू कोसळले. आपण किती निष्ठेने काम केले. मात्र आपल्याला कशा प्रकारची वागणूक दिली हे सांगताना दोघेही बापलेक रडले.
आता तिसरा किस्सा..उमेदवार आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील रडले नाहीत मात्र ते भावनिक झाले. परंतु एका सभेमध्ये त्यांचाच मुलगा राजवर्धन पाटील मात्र चांगलाच रडला. राजवर्धन पाटील यांनी हर्षवर्धन पाटील साहेबांना सोडायचं नाही, असे सांगत कार्यकर्त्यांमध्ये भावनिक आवाहन करताना डोळ्यात पाणी आणले. एकूणच इंदापूर तालुक्यात विधानसभा जिंकण्यासाठी रडणं किती आवश्यक आहे हे आता उमेदवारांनाही सांगावे लागतंय.
इंदापूर विधानसभा मतदारसंघातील निकाल
१९९५- हर्षवर्धन पाटील
१९९९- हर्षवर्धन पाटील
२००४- हर्षवर्धन पाटील
२००९- हर्षवर्धन पाटील
२०१४- दत्तात्रय भरणे
२०१९- दत्तात्रय भरणे