Ratnakar Gutte on Gangakhed Vidhan Sabha: काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय समाज पक्षाने भाजपसोबत फारकत घेऊन राज्यामध्ये स्वतंत्र निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. त्यामुळे राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे एकमेव आमदार रत्नाकर गुट्टे हे राष्ट्रीय समाज पक्षाकडून निवडणूक लढतात की भाजपमध्ये प्रवेश करतात याचीच चर्चा रंगली होती. मात्र या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.
गंगाखेड विधानसभा मतदारसंघ पारंपारिकरित्या भाजपचा मतदारसंघ आहे पण २०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने हा मतदारसंघ मित्रपक्ष राष्ट्रीय समाज पक्षासाठी सोडला. या मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकिटावर आमदार रत्नाकर गुट्टे यांनी विधानसभेची निवडणूक लढवली व मोठ्या फरकाने त्यांनी विजय मिळवला. मागील पाच वर्ष आमदार रत्नाकर गुट्टे हे महायुतीचे घटक पक्षाचे आमदार म्हणून कार्यरत राहिले. मागील दोन वर्ष महायुतीचे सरकार असताना गंगाखेड विधानसभा मतदारसंघात हजारो कोटी रुपयाचा निधी आणून मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम त्यांनी केले आहे. विकासकामाच्या बळावरच पुन्हा एकदा त्यांनी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास तयार होते. २०१४ची निवडणूक ही ते महायुतीच्याच पाठिंब्यावर लढणार होते. पण अचानक काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजपसोबत असलेली युती तोडण्याचा निर्णय घेतला.
भारतीय जनता पक्ष आपल्या सोबत असलेल्या घटक पक्षांना मोठं होऊ देत नाही, असा आरोप करत महादेव जानकर यांनी २०२४च्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील २८८ जागा लढवण्याचा निर्णय घेतला आणि तशा पद्धतीने त्यांनी कामही सुरू केले. पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी घेतलेल्या भूमिकेवर पक्षाचे एकमेव आमदार असलेले रत्नाकर गुट्टे सहमत होतील का, अशीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. आमदार रत्नाकर गुट्टे पुन्हा एकदा राष्ट्रीय समाज पक्षासोबत राहतील की भाजपसोबत जातील अशी चर्चा रंगू लागली आहे. त्यातच मागील चार दिवसांमध्ये आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या भूमिकेवर पडदा होता. आमदार रत्नाकर गुट्टे यांच्याविषयी मतदारसंघात उलटसुलट चर्चा देखील रंगल्या होत्या.
आमदार रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेड येथे पत्रकार परिषद घेऊन अखेर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मी ज्या पक्षासोबत मागील दहा वर्षापासून आहे त्याच पक्षासोबत येथून पुढेही राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. माझ्या संकट काळात राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी मला खंबीर साथ दिली. त्यामुळे मी २०२४ची विधानसभा निवडणूक देखील राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावरच लढणार आहे. राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीतून बाहेर पडलेला असला तरी मी जानकर यांची साथ सोडणार नसल्याचे रत्नाकर गुट्टेंनी स्पष्ट केले. आमदार रत्नाकर गुट्टे यांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता भाजप आणि महायुतीचे घटक पक्ष काय निर्णय घेतात हे पाहावे लागणार आहे.
‘भाजपसह महायुतीचे पक्ष मला पाठिंबा देतील’
राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीतून बाहेर पडला असला तरी गंगाखेड विधानसभा मतदारसंघात मात्र भाजपसह महायुती या निवडणुकीत मला पाठिंबा देणार, अशी ग्वाही रत्नाकर गुट्टे यांनी पत्रकारांना दिली आहे. राज्यामध्ये २८७ जागावर महायुतीच्या विरोधात राष्ट्रीय समाज पक्ष लढणार असला तरी गंगाखेड विधानसभा मतदारसंघात भाजप किंवा अन्य महायुतीचे घटक पक्ष माझ्या उमेदवार माझ्या विरोधात उमेदवार ही देणार नसल्याचे रत्नाकर गुट्टे यांनी जाहीर केले आहे. तसेच विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मी महायुतीलाच पाठिंबा देणार असल्याचेही रत्नाकर गुट्टे यांनी स्पष्ट केले आहे.