Gyayak Patni Joins NCP: कारंजा विधानसभेतील महाविकास आघाडी आणि महायुतीचे गणित आता ३६० डिग्रीच्या कोनात पालटले आहे. भाजपकडून इच्छुक असलेले दिवंगत आमदार राजेंद्र पाटणी यांचे पुत्र ज्ञायक पाटणी यांनी कमळाची साथ सोडत आला तुतारी हाती घेतली आहे.
ज्ञायक पाटणी हे भाजपचे दिवंगत आमदार राजेंद्र पाटणी यांचे पुत्र आहेत. राजेंद्र पाटणीच्या निधनानंतर कारंजा मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवण्यास ते इच्छुक होते. राजेंद्र पाटणी हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या निधनानंतर ग्यायक पाटणी यांना फडणवीसांनी बळ दिले आणि विधानसभेची तयारी करण्यास सांगितले होते. वडिलांच्या निधनानंतर ज्ञायक यांना सहानुभूती मिळावी असा फडणवीस यांचा कयास होता. मात्र निवडणुका जाहीर झाल्यानंतर अचानक पाटणी यांना थांबण्यास सांगण्यात आले आणि त्यांच्या जागी राष्ट्रवादीतून आयात केलेल्या सई डहाके यांना उमेदवारी देण्याची तयारी भाजपने केली आहे.
भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या ज्ञायक पाटणी यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. यावेळी त्यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी तुम्ही निवडणूक लढावा असा आग्रह पाटणी यांच्याकडे धरला होता. त्यानंतर पाटणी यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि प्रमुख नेत्यांच्या भेटी घेऊन राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचे ठरवले होते. त्यानुसार आज हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे.
पक्षप्रवेशादरम्यान त्रायक पाटणी यांनी भाजप कुणालाही विचारात न घेता मनमानी पद्धतीने वागत असल्याचा आरोप केला आहे. तर जयंत पाटील यांनी पाटणी यांचे पक्षात स्वागत करत हा मतदारसंघ आमच्यासाठी हा उमेदवार अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले आहे. तर शरद पवार यांनीही दिवंगत आमदार राजेंद्र पाटणी यांच्या कामाचे कौतुक करत ज्ञायक पाटणी यांना शुभेच्छा दिल् आहेत. तसेच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं काम करावं अशी विनंती देखील केली आहे. कारंजा मतदारसंघात अचानक झालेल्या फेरबदलामुळे कार्यकर्ते आणि मतदारही संभ्रमात असून प्रत्यक्ष निवडणुकीत त्याचे काय परिणाम दिसतात, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.