Dharashiv News: महाविकास आघाडीतील दोन घटक पक्षाच्या उमेदवारांनी एकाच मतदारसंघातून एबी फॉर्मसह अर्ज दाखल केल्याने शुक्रवारी एकच खळबळ उडाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने शनिवारी या मतदारसंघातून उमेदवार जाहीर केली. आता शिवसेना यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी परंडा भूम विधानसभेसाठी राहुल मोटे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तर शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे गटाकडून या जागेबाबत अद्यापपर्यंत कुठलाही खुलासा झालेला नसल्याने आता संपूर्ण जिल्ह्यांचे याकडे लक्ष लागले आहे.
रणजीत ज्ञानेश्वर पाटील यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एबी फॉर्म देऊन उमेदवारी जाहीर करतात माजी आमदार राहुल मोटे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे डोळे लागले होते. ते बंडखोरी करतात की वेगळी चुल मांडतात याकडे सगळ्यांच्या नजरा होत्या पण काल राहुल मोटे यांनी एबी फार्मसह उमेदवारी दाखल केल्याने आघाडीत बिघाडी होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. या मतदारसंघातील महाविकास आघाडीचा नेमका उमेदवार कोण हेच निश्चित होत नव्हते. आज त्यावर तोडगा निघाला असून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राहुल मोटे यांचे नाव निश्चित केले आहे.
रणजीत पाटील शिवसैनिकांच्या भूमिकेकडे लक्ष
परंडा भूम विधानसभा मतदार संघातून रणजीत पाटील हे उमेदवारीसाठी इच्छुक होते. तसं त्यांना पक्षाने एबी फॉर्म देखील दिला होता. परंतु अचानक निर्णय बदलल्याने आता ते कोणता निर्णय घेतात ते पाहावे लागेल. तसेच परंडा भूम वाशी या तालुक्यातील शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे गटातील शिवसैनिक कोणती भूमिका घेतात हे देखील पुढील काही दिवसात दिसून येईल.