Solapur Central Vidhan Sabha BJP Candidate: सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून देवेंद्र कोठे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. देवेंद्र कोठे यांचे काका महेश कोठे सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून भाजपविरोधात लढत आहेत. एकीकडे काका भाजपविरोधात लढत आहेत तर दुसरीकडे पुतण्या भाजपच्या चिन्हावर लढणार आहे.
शिंदे गटाचा विरोध झुगारून भाजपने मारली बाजी
एकनाथ शिंदेच्या शिवसैनिकांनी भाजपला विरोध केला होता. सोलापूर शहर मध्यची जागा शिवसेनेची आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या सोलापुरातील विस्ताराला भाजपने मदत करावी, असे आवाहन करण्यात आले होते. राजकीय खेळ करून सोलापूर शहर मध्यची जागा काढून घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही भाजपच्या इतर मतदारसंघातील उमेदवारांना पाडू, असा इशारा सुद्धा शिवसेना नेत्यांकडून देण्यात आला होता. शिंदे गटाचा विरोध झुगारून भाजपने सोलापूर शहर मध्यच्या जागेवर महायुतीत विजय मिळवला आहे. त्यामुळे आगामी काळात शिंदे गटाची भूमिका महत्वाची ठरणार आहे.
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपचा कट्टर चेहरा
काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार अद्यापही जाहीर झालेला नाही. तर तिकडे एमआयएम पक्षाचे उमेदवार फारूक शाब्दींनी दोन महिन्यापासून प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. प्रणिती शिंदे पंधरा वर्षे आमदार राहिलेल्या मतदारसंघात भाजपने कट्टर हिंदुत्ववादी उमेदवार दिला आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान देवेंद्र कोठे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना मोठे मताधिक्य मिळाल्याने भारतीय जनता पक्षाने सोलापूर शहर मध्यची जागा स्वतःकडे राखून ठेवली आणि युवा चेहरा म्हणून देवेंद्र कोठेंना उमेदवारी जाहीर केली.
देवेंद्र कोठे म्हणतात…
मी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूकीत प्रचार करणार आहे. विकासाच्या जोरावर मत मागणार आहे. माझे काका महेश कोठे जरी तुतारी चिन्हावर सोलापूर शहर उत्तरची जागा लढवत असतील तर त्यांनी मला संपूर्ण स्वातंत्र्य दिले होते. मला त्यांनी काहीही बंधने घातली नाहीत. त्यामुळे माझे काका राष्ट्रवादी तुतारी पक्षातून लढत असतील तर त्यांना शुभेच्छा, लोकशाहीतील मूल्य जपत मी सुद्धा सोलापूर शहर मध्यची जागा भाजपकडून लढणार आहे. एकनाथ शिंदे यांचे शिवसैनिक माझ्यासोबत असतील, ते विरोध करणार नाहीत, असे देवेंद्र कोठे म्हणाले आहेत.