Nagpur Crime News : नागपुरात महिला पोलीस अधिकाऱ्याची लग्नाच्या संकेतस्थळावरुन मोठी फसवणूक करण्यात आली. महिला गर्भवती राहिल्यानंतर तिच्याशी लग्न केलं. मात्र तिचा पगार हडपला, अश्लीस व्हिडिओ व्हायरल करण्यात आले. यानंतर पीडितेने आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
२०१९ मध्ये महिलेची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली होती. ऑगस्ट २०२३ मध्ये त्या नागपूर पोलीस दलात रुजू झाल्या. दरम्यान लग्नासाठी त्यांनी जीवनासाथी डॉट कॉमवर बायोडाटा अपलोड केला. तिथे आधीच आरोपीने बायाडोटा अपलोड केला होता. त्याने त्याच्या बायोडेटामध्ये शासकीय इलेक्ट्रिकल कंत्राटदार असून ८ ते १२ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असल्याची नोंद केली होती. याशिवाय अनेक व्यवसाय असून घर, भूखंड फ्लॅट आणि दोन कार असल्याचंही त्याने नमूद केलं होतं. त्याने ऑल इंडिया अँटी करप्शन क्राइम अँड ह्युमन राइट्स कमिटीचा सदस्य असल्याचंही बायोडेटामध्ये सांगितलं होतं.
महिलेने आरोपीचा बायोडेटा पाहिला आणि त्यानंतर तो वारंवार महिलेशी संपर्क साधू लागला. डिसेंबर २०२३ मध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असताना तो महिलेला भेटायला नागपुरात आला. त्याने यावेळी कार आणली होती. कारने महिलेला घेऊन तो हॉटेलमध्ये गेला. महिलेने खोलीत जाण्यास नकार दिला. आपण लग्न करणार आहोत असं सांगत बळजबरीने त्याने महिलेला खोलीत नेत त्यांच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तो चार ते पाच दिवस नागपुरात राहिला.
दरम्यान महिला या गर्भवती राहिली, याबाबत त्यांनी आरोपीला सांगितलं आणि लग्नाची गळ घातली. मे २०२४ मध्ये आरोपीने आर्य समाज दयानंद भवन येथे महिलेसोबत लग्न केलं. लग्नानंतर आरोपी महिलेचा मानसिक आणि शारीरिक छळ करायला लागला. माहेरी पगार देऊ नको, असंही त्याने बजावलं. तो महिलेला धमकी देऊन पगार घ्यायला लागला. पीडितेने नातेवाईकांसमोरही लग्न करण्याची गळ त्याला घातली. जून महिन्यात शिर्डी येथे आरोपीने महिलेसोबत लग्न केलं. यावेळी दोघांचेही नातेवाईक उपस्थित होते. लग्नात आरोपीने महिलेच्या नातेवाईकांचा अपमान केला. मात्र महिला गर्भवती असल्याने तिने आरोपीला काहीही म्हटलं नाही.
धक्कादायक! लग्नाच्या संकेतस्थळावर फेक बायोडेटा, महिला पोलिसाची फसवणूक; गर्भवती राहिल्यावर अश्लील व्हिडिओ व्हायरल
लग्नानंतर आरोपीने बनावट बायोडेटा अपलोड केल्याची माहिती पीडितेला मिळाली. तसंच आरोपीने महिलेची अश्लील छायाचित्र आणि चित्रफीत मैत्रिणीच्या व्हॉट्सअॅपवर पाठवल्याचं महिलेने पाहिलं. आरोपीने महिलेचा मोबाईल आणि मेलही हॅक केला होता. त्याच्या त्रासाला कंटाळून महिलेने बेलतरोडी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.