Amit Thackeray Mahim Vidhan Sabha : अमित ठाकरेंचा ‘घरातला मुलगा’ असा उल्लेख करत त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर करण्याचं आवाहन शेलारांनी केलं आहे.
नारायण राणेंप्रमाणेच आशिष शेलार आणि राज ठाकरे यांचे मैत्र सर्वश्रुत आहेत. शेलार आणि राज ठाकरे यांची पक्षापलिकडची मैत्री अनेकदा पाहायला मिळते. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी शेलार अनेकदा जाताना दिसतात. त्यामुळे ठाकरेंशी त्यांचा कौटुंबिक स्नेह आहे. त्यामुळे ‘घरातला मुलगा’ असा उल्लेख करत त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर करण्याचं आवाहन शेलारांनी केलं आहे.
आशिष शेलार काय म्हणाले?
“उद्धव ठाकरे यांना अमित ठाकरेंबद्दल नातं वाटत नसेल, पण महायुतीला अशा नात्यागोत्याविषयी फार काही वाटतं. आमच्या घरातील अमित ठाकरे पहिलीच निवडणूक लढवत असेल, तर त्याला समर्थन देण्याची भूमिका घेतली पाहिजे. मी मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना विनंती करतो. ते निर्णय घेतील. महायुतीत कुठलाही मतभेद नाही, मात्र महाराष्ट्राच्या संस्कृतीला जपता येईल, असं नातं आपण दाखवले पाहिजेत. सदा सरवणकर यांच्या उमेदवारीला आमचा विरोध नाहीच. ते महायुतीचे उमेदवार आहेत. पण महायुती म्हणून निर्णय घ्यावा” असं आशिष शेलार म्हणाले.
Ashish Shelar : उद्धवजींना नातं वाटत नसेल, पण आमच्या घरातला अमित पहिली निवडणूक लढतोय, सरवणकरांनी माघार घ्यावी, शेलारांचं मत
कोपरीतून मनसेची माघार
दुसरकडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाण्यातील चार जागांवर उमेदवार देणार होती. कोपरी पाचपाखाडीसाठी अभिजीत पानसे यांचं नाव निश्चित झालं होतं, मात्र अखेरच्या क्षणी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या मैत्रीतून तिथे उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. राज ठाकरे हे दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आहेत, अशा शब्दात मनसेच्या काही नेत्यांनी त्यांच्या या निर्णयाचं कौतुकही केलं. त्यामुळे राज ठाकरेंनी दाखवलेल्या ‘दर्यादिली’नंतर अमित यांच्या विरोधातील सरवणकरांची उमेदवारी शिंदे मागे घेणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे.