Maha Vikas Aghadi: ‘समान सूत्रा’ने जागांना कात्री; मविआचा नवा फॉर्मुला, आता तिन्ही पक्षांना प्रत्येकी ९० जागा

MVA Seat Sharing: आघाडीत प्रत्येकी ९० जागांचे सूत्र निश्चित झाल्यास गेल्या निवडणुकीच्या तुलनेत शिवसेनेला (उबाठा) ३४ जागा कमी मिळणार आहेत. काँग्रेसला ५७ जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेसला ३१ जागा कमी मिळणार आहेत.

हायलाइट्स:

  • तिन्ही पक्षांच्या वाट्याला गेल्या वेळेपेक्षा कमी जागा
  • इच्छुकांच्या आशेवर पाणी; बंडाला खतपाणी
  • जागांच्या अदलाबदलीबाबत चर्चा सुरूच
महाराष्ट्र टाइम्स
mva aghadi

मुंबई : महाविकास आघाडीत काँग्रेस हाच मोठा भाऊ असेल, असे काँग्रेसचे नेते लोकसभा निवडणूक निकालानंतर छातीठोकपणे सांगत असताना, आता मात्र बाळासाहेब थोरात यांनी आघाडीत समसमान जागांचे सूत्र जाहीर केले आहे. काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी प्रत्येकी ९० जागा लढतील आणि मित्रपक्षांना १८ जागा सोडण्यात येतील, असे त्यांनी शुक्रवारी दिल्लीत स्पष्ट केल्यानंतर शनिवारी त्याचा मुंबईत पुनरुच्चार केला. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने ‘आघाडीत समसमान जागांचे सूत्र’ हे वृत्त काही महिन्यांपूर्वीच दिले होते.आघाडीत प्रत्येकी ९० जागांचे सूत्र निश्चित झाल्यास गेल्या निवडणुकीच्या तुलनेत शिवसेनेला (उबाठा) ३४ जागा कमी मिळणार आहेत. काँग्रेसला ५७ जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेसला ३१ जागा कमी मिळणार आहेत. या नव्या सूत्रामुळे तिन्ही पक्षांमधील आशा पल्लवित झालेल्या अनेक उमेदवारांच्या नाराजीचा सामना या तिन्ही पक्षांना करावा लागणार, हे स्पष्ट आहे. त्यात काँग्रेसने आपल्या विदर्भातील जागा वाचवण्यासाठी मुंबईतील अनेक चांगल्या जागांवर पाणी सोडल्याचेही स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी रात्रीपर्यंत वर्सोवाची जागा काँग्रेसला सुटणार, असे ठामपणे सांगणाऱ्या काँग्रेस नेत्यांना शनिवारी मोठा धक्का बसला. शिवसेनेने या जागेवर मुस्लिम उमेदवार दिल्याने काँग्रेसला तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे.

या तीन पक्षांच्या आघाडीमुळे निवडणूक लढण्याची संधी गमवावी लागल्याने अनेक शिवसैनिकांमध्येही अस्वस्थता आहे. भाजप-शिवसेना युती असताना शिवसेना नेतृत्वाचा जागावाटपात कायमच वरचष्मा राहिला होता. पूर्वी १७१-११७ असे असलेले सूत्र मोदी लाटेनंतर बदलले आणि त्यांना गेल्या वेळी १२४ जागा भाजपकडून सुटल्यानेही ‘मातोश्री’ नाराज असल्याची चर्चा शिवसैनिकांमध्ये होती. मात्र, आता त्या १२४ जागाही खूप होत्या, अशी चर्चा शिवसैनिकांमध्ये आहे. मात्र, महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेत्यांच्या म्हणण्याप्रमाणे तीन पक्षांची आघाडी असल्यामुळे यापूर्वी जितक्या जागा लढल्या गेल्या, त्यात काटछाट होणे स्वाभाविक आहे.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपींनी सांगितलं धक्कादायक कारण, भाईसाठी केलं…
जागावाटपात शरद पवार यांनी आधीपासूनच महाराष्ट्रभर फिरून ‘राष्ट्रवादी’तील फुटीच्या पार्श्वभूमीवर कोणत्या जागा लढल्या पाहिजेत व कोणत्या सोडल्या पाहिजेत, याचे योग्य समीकरण जुळवले. त्यामुळे सर्वाधिक तणाव हा काँग्रेस व शिवसेनेतच (उबाठा) निर्माण झाला. काँग्रेस व शिवसेना (उबाठा) या दोन्ही पक्षांनी विदर्भ व मुंबईतील जागांवर जोरदार दावा केला होता. शिवसेनेला विदर्भात फारसा जनाधार नाही, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे होते. मात्र, काँग्रेसचा मुंबईत आजही मतदार असल्याचे त्यांचे म्हणणे होते. शिवसेना नेतृत्व हा तर्क मान्य करण्यास तयार नव्हते. त्यातच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले व मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्यातही लोकसभा निवडणुकीपासून तणाव होता. ईशान्य मुंबई शिवसेनेला सोडून त्या बदल्यात विदर्भातील एक जागा घेतल्याने हा तणाव निर्माण झाल्याचे गायकवाड यांच्या समर्थकांचे म्हणणे होते. त्यामुळे मुंबईतील जागा अडवल्याने शिवसेनेने चलाखी करून विदर्भातील काँग्रेसचे गड असलेल्या दक्षिण नागपूरसारख्या जागांवरही जोरदार दावा केला. अखेर पूर्वी ठरलेल्या समसमान जागांच्या सूत्रांवर महाविकास आघाडीतील दिग्गज नेते उतरल्यामुळे शिवसेनेला विदर्भातील जागा व काँग्रेसला मुंबईतील जागा सोडाव्या लागल्या. त्यामुळे भायखळा, वर्सोवा, वांद्रे पूर्व या जागांचा अत्याग्रह काँग्रेसला सोडावा लागला.

मुंबईसारख्या शहरात मराठी मतदार व अल्पसंख्य आणि काँग्रेसचे उदारमतवादी मतदार यांमुळे जिंकण्यासाठी चांगली स्थिती असल्याचे राजकीय क्षेत्रातील अनेकांचे मत असल्याने काँग्रेसमधून अनेकांना यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची इच्छा होती. मात्र, शिवसेना नेतृत्वामुळे या इच्छेवर त्यांना पाणी सोडावे लागले आहे.
राहुल नार्वेकरांपेक्षा आशिष शेलार श्रीमंत, पाच वर्षांत संपत्तीत किती वाढ? जाणून घ्या
दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांनाही ३४ जागांवर पाणी सोडावे लागल्याने व काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी हा वाद दिल्ली दरबारी नेल्याने बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनाच हा हरताळ फासण्यासारखे असल्याची टीका शिंदे यांच्या शिवसेनेकडून होत आहे. मात्र, त्याचवेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील एका ज्येष्ठ नेत्याच्या म्हणण्यानुसार, महाविकास आघाडीत आम्ही जितक्या जागा मिळवल्या आहेत, तितक्या जागा शिंदे यांना मिळाल्या तर त्यांनी आमच्यावर टीका करावी, अन्यथा दिल्लीच्या वाऱ्या करून भाजपच्या शिर्षस्थ नेतृत्वाकडून जे पदरात पडले आहे ते पवित्र मानून निवडणुकीच्या आखाड्यात यावे, जनता ही कुस्ती कोण जिंकणार, त्यावर शिक्कामोर्तब करणारच आहे.

थोरात पुन्हा ‘मातोश्री’वर

आघाडीतील प्रत्येकी ९०चे सूत्र प्राथमिकरित्या ठरले असले, तरी ते पक्के आहे किंवा कसे याबाबत अद्यापही संभ्रम आहे. कारण, काही जागांच्या अदलाबदलीबाबत शेवटपर्यंत चर्चा सुरूच राहणार असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. बाळासाहेब थोरात शनिवारी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी ‘मातोश्री’वर पोहोचले. काही जागांमध्ये बदल होऊ शकतात का, त्या दृष्टीने या बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली.

एकत्रित कार्यक्रमांबाबत चर्चा

राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांना एकत्र येऊन काही कार्यक्रम करायचे आहेत. त्याविषयीही उद्धव यांच्याशी चर्चा झाल्याचे थोरात म्हणाले. काहीही झाले तरी मैत्रीपूर्ण लढती अजिबात करणार नाही, हेदेखील त्यांनी आवर्जून सांगितले.
शिकण्यासाठी जाल, शवपेटीतून याल; माजी उच्चायुक्तांचा कॅनडाबाबत विद्यार्थ्यांना गंभीर इशारा
जागाबदलाचे प्रयत्न

भूम परांडा, पाटण या जागांवरील उमेदवारांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष समाधानी नसल्याने त्यांनी शिवसेना नेतृत्वाला या जागा बदलण्याबाबत सांगितल्याचे समजते. भूम परांडा येथे पवार यांच्या पक्षाने व शिवसेना (उबाठा) दोघांनीही उमेदवार दिल्याने निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू आहे. मात्र, त्याच्या बदल्यात शिवसेनेला ते कोणत्या जागा सोडतात, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

भाजप, पवार गटाचे
उमेदवार जाहीर
पुणे :
पुणे जिल्ह्यातील काही रखडलेल्या विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शनिवारी केली. भाजपने पुणे कँटोन्मेंट व खडकवासला मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुनील कांबळे व भीमराव तापकीर यांना पुन्हा उमेदवारी दिली असून, कसबा पेठ विधानसभा मतदारसंघासाठी हेमंत रासने यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने खडकवासल्यातून अपेक्षेनुसार सचिन दोडके यांना पुन्हा संधी दिली आहे, तर पर्वती विधानसभेतून अश्विनी कदम भाजपच्या माधुरी मिसाळ यांच्याविरोधात लढणार आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने सत्यजित शेलकर (जुन्नर) व सुलक्षणा शीलवंत (पिंपरी) यांचीही नावे शनिवारी जाहीर केली.

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

maha vikas aghadiMumbai news todaymva seat sharingMVA Seat Sharing Formulaseat sharing for vidhan sabha election 2024कॉंग्रेसमहाविकास आघाडीराष्टवादी काँग्रेसशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
Comments (0)
Add Comment